web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या वीर जवानाने गाजवला दिल्ली दरबार; विजय देसले यांचा देशसेवेतील अद्भुत सन्मान

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाडच्या मातीतून भारतीय सैन्यात दाखल होऊन देशसेवेचे कर्तव्य बजावणारे वीर जवान विजय देसले यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप थेट दिल्ली दरबारात उमटवली आहे. तिन्ही सेनादलांचे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) यांच्याकडून प्रशंसा मेडल मिळाल्याने विजय देसले यांचे मुरबाडसह संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे.

विजय देसले यांनी आपल्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर मिळवलेला हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा विषय नसून मुरबाडच्या भूमीसाठी आणि त्यांच्या आई-वडिलांसाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे. आपल्या कुटुंबाचे आणि मुरबाड नगरीचे नाव देशाच्या राजधानीत पोहोचवण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे.

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अथवा सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांचे योगदान शब्दांत मांडणे कठीण आहे. अशा परिस्थितीत विजय देसले यांनी मिळवलेले हे प्रशंसा मेडल त्यांच्या उत्कृष्ट सेवेला मिळालेली पोचपावती मानली जात आहे.

मुरबाडच्या एका जवानाने दिल्ली दरबार गाजवला, ही बाब मुरबाडकरांसाठी निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे मुरबाडमधील भावी पिढीला भारतीय सैन्यात जाण्याची, देशसेवा करण्याची आणि आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी भव्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

आज विजय देसले यांचा सन्मान हा केवळ एका जवानाचा सन्मान नसून मुरबाडच्या शौर्यपरंपरेचा सन्मान आहे. त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेत मुरबाडचे हजारो तरुण भारतीय सैन्यात सहभागी होऊन देशसेवेसाठी पुढे येतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

मुरबाडची माती, देशसेवेची नाती आणि विजय देसले यांचे कर्तृत्व—हीच मुरबाडच्या शौर्याची नवी ओळख!विजय देसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील देशसेवेसाठी हार्दिक शुभेच्छा! 

No comments