बोगस एआय निर्मित वृत्तपत्रांना अधिकाऱ्यांची पसंती;एआयच्या नावाखाली बोगस पत्रकारितेला खतपाणी?
गौरव शेलार / ठाणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत असताना, एआयच्या साहाय्याने तयार होणाऱ्या बोगस व अविश्वसनीय वृत्तपत्रांची संख्या वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही संशयास्पद माध्यमांना प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या कथित प्राधान्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे.
पत्रकारिता अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी एआयचा वापर योग्य असला, तरी तथ्य पडताळणी न करता तयार झालेल्या बातम्या अधिकृत वृत्त म्हणून प्रसारित होणे ही गंभीर बाब असल्याचे जाणकारांचे मत आहे. खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती समाजात गोंधळ निर्माण करू शकते, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अशा कथित एआयनिर्मित वृत्तपत्रांच्या पानांवर बोगस अथवा संशयास्पद आरएनआय क्रमांकाचा वापर केला जात असल्याची बाबही चर्चेत आली आहे.
स्थानिक पत्रकारांच्या मते, अधिकृत कार्यक्रमांची माहिती, प्रसिद्धीपत्रके आणि प्रशासनिक कागदपत्रे काही निवडक माध्यमांनाच उपलब्ध होत असल्याने समान निकषांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नोंदणीकृत व जबाबदार पत्रकारितेला दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना अनेक पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील जाणकारांनी प्रशासनाने कोणत्याही माध्यमाला प्राधान्य देताना त्याची नोंदणी, संपादकीय जबाबदारी, पत्रकारांची ओळख आणि प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची सत्यता यांची पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. एआयला विरोध नसून, त्याच्या नावाखाली बोगस पत्रकारितेला खतपाणी घालू नये, अशी भूमिका व्यक्त होत आहे.



No comments