web-banner-lshep2024

Breaking News

लीजधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार किसन कथोरे यांचा ऐतिहासिक पुढाकार; मुरबाडमध्ये भव्य जनजागृती व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

कुणाल शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील भोगवटादार वर्ग-२ (लीजधारक) नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यसम्राट आमदार किसन शंकर कथोरे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आता यश मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुरबाड येथील कुणबी समाज हॉलमध्ये लीजधारकांसाठी भव्य जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने लीजधारक, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, महसूल विभागाचे अधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, मुरबाड शहरातील भोगवटादार वर्ग-२ अर्थात लीजधारकांचा प्रश्न हा केवळ स्थानिक नसून जनहिताचा अत्यंत गंभीर विषय आहे. यासाठी त्यांनी विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री यांचे लक्ष वेधत हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची जोरदार मागणी केली. भोगवटादार वर्ग-२ मधील नागरिकांना तीन महिन्यांच्या आत भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी शासनासमोर मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याच विषयावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत आमदार किसन कथोरे यांनी लीजधारकांच्या अडचणी, त्यांच्या न्याय्य मागण्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावांचा सविस्तर आढावा मांडत नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. या चर्चेनंतर महसूल मंत्र्यांनीही विषय गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले.

मुरबाड शहरात एकूण २६७ लीजधारक असून त्यापैकी २२७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. तसेच ३६ प्रस्ताव विविध कारणांमुळे रखडलेले आहेत. अनेकांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर जागा देण्यात आल्या होत्या, मात्र त्या मुदतीही संपुष्टात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लीजवरील जागा असल्यामुळे वारसनोंद होत नाही, मालकी हक्क मिळत नाही, प्रॉपर्टी कार्ड तयार होत नाही आणि नागरिकांना अनेक कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी आमदार कथोरे यांनी लीजधारकांना सविस्तर मार्गदर्शन करत भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व तरतुदी, अटी, नियम, कागदपत्रांची पूर्तता आणि शासनाची प्रक्रिया याबाबत माहिती दिली. "जोपर्यंत लीजधारकांना मालकी हक्क मिळत नाही, तोपर्यंत त्यांचे प्रश्न कायम राहणार आहेत. त्यामुळे शासनाने आता हा प्रश्न प्राधान्याने हातात घेतला असून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार कथोरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली आहे. महसूल मंत्री म्हणून बावनकुळे यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांचे कौतुक करत त्यांनी सांगितले की, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ करण्याचे अधिकार देण्यात आले असून कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली आहे.

यावेळी आमदार कथोरे यांनी सर्व लीजधारकांना आवाहन केले की, आठ ते दहा दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे अर्जासह तहसीलदार कार्यालयात सादर करावीत. प्रकरणे वरिष्ठांकडे गेल्यानंतर विलंब होऊ नये यासाठी नागरिकांनी तातडीने कार्यवाही करावी. "घर सुरक्षित आणि स्वतःच्या नावावर करायचे असेल, तर हीच योग्य वेळ आहे. शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ प्रत्येक लीजधारकाने घ्यावा," असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी राज्य शासनाने घेतलेल्या अकरा वर्षांपूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचाही उल्लेख केला. मुरबाड तालुक्यातील सोनारपाडा, माता नगर, नागाचा खडक यांसारख्या भागांतील नागरिकांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर मुरबाडच्या विकासाचा आढावा घेताना आमदार कथोरे म्हणाले की, "मुरबाडमध्ये उगम होतो आणि त्याचा प्रकाश संपूर्ण राज्यभर पोहोचतो." मुरबाडमध्ये काँक्रीट रस्ते, स्काय ब्रिज, बसस्थानक विकास, शिवशंकर मंदिर परिसराचे काम, नगरपंचायत हद्दीतील सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यवधींचे रस्ते, भविष्यातील अंडरग्राउंड वीजवाहिन्या, नवीन प्रशासकीय कार्यालये अशा अनेक विकासकामांचा त्यांनी उल्लेख केला.

 

यावेळी आमदार किसन कथोरे यांनी व्यासपीठावरून लीजधारकांशी सविस्तर संवाद साधत शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील लीजधारकांच्या न्याय्य मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल मंत्री म्हणून बावनकुळे यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांचे कौतुक करत आमदार कथोरे म्हणाले की, नागरिकांच्या हितासाठी शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलले असून कोणत्याही लीजधारकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आपण स्वतः उपस्थित होतो. त्या बैठकीत लीजधारकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठोस भूमिका घेतली. विशेष म्हणजे भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ करण्याचे अधिकार ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून संबंधित प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार कथोरे यांनी सर्व लीजधारकांना आवाहन केले की, आठ ते दहा दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे अर्जासह तहसीलदार कार्यालयात सादर करावीत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रकरणे वरिष्ठ स्तरावर पाठवून शक्य तितक्या कमी कालावधीत निर्णय घेण्यात येईल. "घर सुरक्षित करायचे असेल, मालकी हक्क मिळवायचा असेल आणि आपल्या नावावर प्रॉपर्टी कार्ड तयार करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. शासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा प्रत्येक लीजधारकाने लाभ घ्यावा," असे आवाहन त्यांनी केले.

लीजवरील जागेमुळे अनेक नागरिकांना वारसनोंद, मालकी हक्क, प्रॉपर्टी कार्ड, बँक कर्ज तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येतात. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे राज्य शासनाने विशेष लक्ष दिले असून या विषयात सातत्याने पाठपुरावा करून शासनाचे लक्ष वेधण्यात आपण यशस्वी झाल्याचे आमदार कथोरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी राज्य शासनाने अकरा वर्षांपूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या निर्णयाचाही उल्लेख केला. हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा असून मुरबाड तालुक्यातील सोनारपाडा, माता नगर, नागाचा खडक यांसारख्या भागांनाही त्याचा मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरबाडच्या विकासकामांचा आढावा घेताना आमदार कथोरे म्हणाले की, आज मुरबाडची ओळख संपूर्ण राज्यात विकासकामांमुळे निर्माण झाली आहे. मुरबाडमध्ये काँक्रीट रस्ते, स्काय ब्रिज, बसस्थानक विकास, दलाल संगम परिसरातील शिवशंकर मंदिराचे काम, नगरपंचायत हद्दीतील विविध सुशोभीकरण प्रकल्प, गावागावांना जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना अशा अनेक विकासकामांमुळे मुरबाडची विकासाची दिशा बदलली आहे.

"मुरबाडमध्ये उगम होतो आणि त्याचा प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतो," असे सांगत त्यांनी मुरबाडमध्ये झालेल्या विविध निर्णयांचा उल्लेख केला. मुरबाडच्या धरतीवर निघालेले अनेक शासन निर्णय आज संपूर्ण राज्यात लागू होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

माळशेज घाटातील प्रस्तावित काचेच्या स्कायवॉकबाबत बोलताना आमदार कथोरे यांनी सांगितले की, काहींनी अपुरी माहिती घेऊन टीका केली. मात्र हा विषय राज्य शासनापुरता मर्यादित नसून सर्वोच्च न्यायालयाच्या परवानग्यांशी संबंधित असल्याने प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. तरीही माळशेज घाटात स्कायवॉक उभारण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी आमदार किसन कथोरे यांनी मुरबाडच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेताना गेल्या काही वर्षांत झालेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांसमोर मांडली. मुरबाडमध्ये काँक्रीट रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले असून शहरातील विविध विकासकामांना गती मिळाली आहे. दलाल संगम परिसरातील शिवशंकर मंदिराचे काम सुरू असून नगरपंचायत हद्दीतील विविध सुशोभीकरणाची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. गावागावांना जोडणारे रस्ते, नागरिकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांमुळे मुरबाडची विकासाची वाटचाल आता कोणीही थांबवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुरबाडमध्ये प्रथमच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण प्राधान्य दिले. पूर्वी शहरात पाण्याची तीव्र टंचाई होती, मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली असून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर गावागावांतील तंटे मिटवून विकासाची दिशा दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तहसीलदार कार्यालय शहराबाहेर स्थलांतरित झाल्यानंतर जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या जागेचा नागरिकांच्या हितासाठी उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या ठिकाणी स्वतंत्र प्रांत कार्यालय मंजूर झाले असून काम सुरू आहे. तसेच जुन्या तहसीलदार कार्यालयात विविध शासकीय सेवा, आधार कार्ड व इतर महसुली कामे नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांचे विशेष कौतुक करत आमदार कथोरे म्हणाले की, प्रत्येक गावात स्वतः जाऊन महसूल शिबिरे घेण्याचा, नागरिकांच्या समस्या गावातच सोडविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाची दखल ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेत महसुली सत्कार केला. नागरिकांच्या दारी प्रशासन पोहोचविण्याचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगत तहसीलदारांचे मनापासून अभिनंदन केले.

भविष्यातील विकासकामांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मुरबाड शहरातील एमएसईबीचे उघडे वीज खांब आणि तारा टप्प्याटप्प्याने हटवून संपूर्ण वीजवाहिन्या भूमिगत (अंडरग्राउंड) करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही मोठा फायदा होणार आहे.

तसेच आदिवासी भागातील नागरिकांसाठी नवीन वातानुकूलित (एसी) बस उपलब्ध करून देण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना अधिक चांगली व सुरक्षित प्रवासी सेवा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मुरबाड मतदारसंघातील गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक निधी मुरबाडला मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले. "एकही मुख्य रस्ता विकासापासून वंचित राहणार नाही," अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी टोकावडे–उमरोली फिडरसाठी १४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत लवकरच त्या कामाचे भूमिपूजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काहीजण केवळ पत्रव्यवहार करून कामे झाल्याचा दावा करतात,लाईन मारून चालत नाही, त्यासाठी लग्न करावे लागते.प्रत्यक्ष पाठपुरावा, शासनाशी सातत्याने संपर्क आणि निर्णयक्षम नेतृत्व यामुळेच विकासकामे मार्गी लागतात,असाही मार्मिक टोला लगावून त्यांनी आपल्या भाषणातून लगावला.

मुरबाडच्या विकासासाठी डीपीडीसी निधीतून विविध कामे मंजूर करण्यात आली असून झाडांची अनावश्यक तोड टाळून नियोजनबद्ध विकास केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी आमदार किसन कथोरे यांनी सर्व लीजधारकांना पुन्हा एकदा आवाहन केले की, तहसीलदारांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या बैठकीनंतर तीन महिन्यांच्या आत भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन सकारात्मक असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

यावेळी मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक मोहन सासे यांनी प्रास्ताविकात आमदार किसन कथोरे यांच्या विकासकामांचा आढावा घेत लीजधारकांच्या प्रश्नासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक केले. कोणत्याही नागरिकाला काही अडचण असल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

यावेळी व्यासपीठावर कार्यसम्राट आमदार किसन कथोरे, मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख, मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, ज्येष्ठ उल्हासभाऊ बांगर, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिपक पवार, ॲड. जितेंद्र भावार्थे, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष एकनाथ पोगेरे, ज्येष्ठ कार्यकर्ते भाई तेलवणे, युवा उद्योजक अनिल घरत, कार्यक्रमाचे आयोजक मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे, उपनगराध्यक्ष मोहन गडगे, उपनगराध्यक्षा नम्रता नितीन तेलवणे, नगरसेविका मानसी मनोज देसले, उर्मिला सुजित ठाकरे, रवीना विनायकराव (अधिकारी), माजी नगराध्यक्ष मुकेश विशे, नगरसेवक अक्षय रोठे, संतोष जाधव, सागर चंबावणे, महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने लीजधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी लीजधारकांच्या प्रश्नासाठी आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आढावा घेतला. अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न शासन दरबारी पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आमदार कथोरे यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लीजधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त करत लीजधारकांच्या प्रश्नावर शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. भोगवटादार वर्ग-२ मधील नागरिकांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी सुरू झालेली प्रक्रिया ही ऐतिहासिक असून तिचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मार्गदर्शन शिबिरादरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित लीजधारकांच्या शंकांचे निरसन केले. आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरणासाठी आवश्यक अटी व शासनाच्या तरतुदी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांनी कोणतीही अपूर्ण माहिती न ठेवता सर्व कागदपत्रांसह विहित मुदतीत तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले.

आमदार किसन कथोरे यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात पुन्हा एकदा स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे लीजधारकांच्या प्रश्नावर ऐतिहासिक निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन महिन्यांच्या आत भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ करण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असून कोणत्याही पात्र लीजधारकावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

"आज घर आहे, पण मालकी नाही; उद्या त्याच घराचे प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावावर झाले पाहिजे, हा शासनाचा आणि आपला उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक लीजधारकाने ही संधी गमावू नये. आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ घ्यावा," असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मण घागस सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक मोहन सासे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मार्गदर्शन शिबिरासाठी आलेल्या सर्व लीजधारक नागरिकांसाठी भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या जनजागृती व मार्गदर्शन शिबिरामुळे मुरबाड शहरातील लीजधारकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भोगवटादार वर्ग-२ वरून वर्ग-१ प्रश्नाच्या निकाली प्रक्रियेला आता गती मिळणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

No comments