web-banner-lshep2024

Breaking News

कोट्यवधींच्या उड्डाणपुलाला फोडून दिले ‘धबधब्याचे’ रूप! संरक्षण कठडा तोडून पाण्याचा निचरा; लहान मुलांना मिळतेय माळशेज घाटाची ‘मजा’

 

नामदेव शेलार /  मुरबाड : मुरबाड–कल्याण मार्गावरील मुरबाड एसटी बसस्थानक आणि शहराच्या प्रवेशद्वाराजवळ कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुलावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था अपुरी पडत असल्याने चक्क पुलाच्या संरक्षण कठड्यालाच ठिकठिकाणी फोडून पाण्याचा मार्ग तयार करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून अक्षरशः ‘धबधबा’ कोसळत असून, या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माळशेज घाटात धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. मात्र आता मुरबाड शहरातील या उड्डाणपुलावरून कोसळणारे पाण्याचे प्रवाह पाहण्यासाठी लहान मुलांपासून नागरिकांपर्यंत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुलावरून खाली कोसळणारे पाणी वाहनचालक आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर अचानक पडत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

पाइप बसवले, पण पाण्याचा प्रवाह कठडा फोडून!

पुलाच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पाइप बसविण्यात आल्याचे दिसून येते. मात्र प्रत्यक्ष पावसाळ्यात या व्यवस्थेचा अपेक्षित वापर होत नसल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. उलट काही ठिकाणी संरक्षण कठडा तोडून पाण्याला थेट खाली सोडण्यात आले आहे.

पुलाचे नियोजन करताना पावसाच्या पाण्याचा प्रवाह, ड्रेनेज व्यवस्था आणि पाण्याचा अंतिम निचरा याचा योग्य विचार करण्यात आला होता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. नियोजन योग्य होते, तर संरक्षण कठडा फोडण्याची वेळ का आली? आणि नियोजनातच त्रुटी असतील, तर त्याला मंजुरी देणाऱ्या संबंधित यंत्रणेची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न मुरबाडकर विचारत आहेत.

मुरबाड शहरात पाणी साचण्यामागे पुलाची रचना कारणीभूत?

अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुरबाड शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. जुना पेट्रोल पंप परिसर तसेच म्हसा रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. या पाण्याच्या निचऱ्याबाबतही नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि शहरातील पाण्याचा निचरा याचा समन्वय साधून काम झाले नसल्यास भविष्यात अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पुलाखाली अनधिकृत दुकानांचा प्रश्न गंभीर

हा उड्डाणपूल मुरबाड नगरपंचायत हद्दीत आणि शहरातील प्रमुख मार्गावर आहे. पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात, तर पुलाखाली शेकडो दुकाने व व्यावसायिक आस्थापना असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा ठिकाणी पुलावरून वेगाने पाणी कोसळणे, वाहनचालकांचे लक्ष विचलित होणे किंवा अचानक पाण्याचा मारा होणे यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपंचायत प्रशासन तसेच संबंधित महामार्ग अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

माळशेज घाटातील रस्ता खचल्याने आधीच प्रश्नचिन्ह

नुकतेच माळशेज घाटातील नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याच्या काही भागात खचल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुरबाड शहरातील उड्डाणपुलावरील पाणी निचऱ्याची ही ‘जुगाडू’ व्यवस्था समोर आल्याने नागरिकांचा संशय आणखी बळावला आहे.

स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी

करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी मुरबाडकरांकडून होत आहे. पुलाच्या बांधकामाचा दर्जा, पावसाच्या पाण्याचा निचरा, ड्रेनेजचे नियोजन आणि संरक्षण कठडा तोडण्यामागील कारण याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदार, देखरेख करणारे अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘पुलाच्या बुडाखाली लागलेली शेगडीची आग विझवणार कधी?’ कोट्यवधींच्या या प्रकल्पाचा दर्जा आणि सुरक्षितता टिकविण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा मुरबाडकर व्यक्त करीत आहेत.

 

No comments