web-banner-lshep2024

Breaking News

सायबर फसवणुकीच्या 'म्युल अकाउंट' रॅकेटवर मुरबाड पोलिसांचा घाव; 1 आरोपी अटकेत...

 

रामदास पष्टे / मुरबाड : सायबर फसवणुकीतून मिळणारी रक्कम विविध बँक खात्यांद्वारे फिरवून तिचा माग काढणे कठीण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'म्युल अकाउंट' प्रकरणावर मुरबाड पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोबाईल फोन, एटीएम कार्ड, स्वाईप मशीन, सिम कार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

सायबर पोलिस ठाणे, ठाणे ग्रामीण यांच्या तांत्रिक तपासात मुरबाड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियातील एका खात्यावर देशभरातील विविध ठिकाणांहून सुमारे चार लाख रुपये सायबर फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित खात्याच्या तपासातून मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान हे खाते मुरबाड तालुक्यातील खाटेघरे येथील राहणारा एक इसाम हा वापरत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार मोबाईल फोन, दोन एटीएम कार्ड, दोन एटीएम स्वाईप मशीन, सहा पेन ड्राईव्ह, एक क्यूआर कोड स्कॅनर मशीन तसेच २७ सिम कार्ड जप्त करण्यात आले.

प्राथमिक चौकशीत संबंधित खाते क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसह सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यावर सुमारे चार लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या व्यवहारांमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,पोहवा नितीन घाग,रामदास शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पारधी तसेच सायबर पोलीस ठाणेचे सपोनि दानिश मंसूरी,पोउपनि मयुरेश अंबाजी, पोना गोखले आणि परदेशी यांनी केली आहे.

No comments