web-banner-lshep2024

Breaking News

जीव धोक्यात घालून अंधारावर मात करणारे ’’उजेडाचे खरे शिल्पकार’’ मुरबाडचे महावितरण कर्मचारी

 

कुणाल शेलार / मुरबाड : मुसळधार पावसाने मुरबाड तालुक्यासह संपूर्ण परिसरात अक्षरशः हाहाकार माजविला आहे.अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली,रस्ते पूल पाण्याखाली गेले,गावांचा संपर्क तुटला,तर वीजवाहिन्या तुटणे,वीज खांब कोसळणे आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होण्याच्या घटनाही घडल्या.या संकटाच्या काळात पोलीस,महसूल,आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथकांप्रमाणेच आणखी एक यंत्रणा अहोरात्र नागरिकांच्या सेवेत उभी आहे ती म्हणजे महावितरणचे अधिकारी आणि वीज कर्मचारी.

मुसळधार पाऊस,वादळी वारे,अंधार,पूराचे पाणी आणि जीवघेण्या परिस्थितीतही हे कर्मचारी एका फोनवर घटनास्थळी धाव घेतात.शेवाळलेल्या,निसरड्या आणि पावसाने भिजलेल्या वीज खांबांवर चढून,तुटलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त करत ते अक्षरशः मृत्यूशी दोन हात करतांना दिसले आहेत.एका चुकीच्या पावलाची किंमत जीवाने मोजावी लागू शकते, याची पूर्ण जाणीव असूनही त्यांच्या कर्तव्याप्रतीची निष्ठा त्यांना अशावेळी मागे हटू देत नाही.त्यांच्या मनात एकच ध्यास असतो नागरिकांच्या घरातील अंधार दूर करून पुन्हा उजेड निर्माण करण्याचा आणि त्यामुळेच अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ते रात्रंदिवस अथक परिश्रम घेतांना दिसले आहेत.

दुर्गम डोंगरवाडी असो,आदिवासी वाडे पाडे असो किंवा शहरातील वस्ती;तक्रार मिळताच महावितरणचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचतात.पूराच्या पाण्यातून वाट काढत,चिखल तुडवत,मुसळधार पावसात भिजत आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत ते आपले काम पूर्ण करतांना दिसतात.स्वतःच्या कुटुंबाची चिंता बाजूला ठेवून हजारो कुटुंबांच्या चेहर्‍यावर पुन्हा समाधानाचे हास्य फुलविण्याचे कार्य निस्वार्थ भावनेने ते करित आहेत.

समाजात विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक केले जाते,मात्र भर पावसात जीव धोक्यात घालून अंधाराशी झुंज देणार्‍या या वीज योद्ध्यांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते याची खंत आपल्याला असायलाच हवी.प्रत्यक्षात त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच पूरग्रस्त भागातील जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यास मोठी मदत होते.आपल्या घरातील एक दिवा पुन्हा पेटावा,मुलांचे शिक्षण थांबू नये,रुग्णालये,पाणीपुरवठा आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी महावितरण कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून मुरबड तालुक्यासाठी कार्यरत राहिले आहेत.

मुरबाड तालुक्यातील महावितरणचे सर्व अधिकारी,अभियंते,तंत्रज्ञ आणि वीज कर्मचारी यांनी या आपत्तीच्या काळात दाखविलेली तत्परता,धैर्य,कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव हा समाजासाठी प्रेरणादायी आहे.संकट कितीही मोठे असले तरी नागरिकांच्या घरात पुन्हा प्रकाश पोहोचविण्याचा त्यांचा निर्धार खर्‍या अर्थाने समाजाला आश्‍वस्त करणारा आहे.वीज कर्मचारी यांनी माणूसकी झरी जपून पुन्हा त्यांचे कर्तव्य भरपावसात भिजुन पार पाडले आहे.त्यामुळे महावितरण क्षेत्रातील हेच खरे पावसातील निःशब्द योद्धे आणि अंधारावर मात करून उजेड निर्माण करणारे “उजेडाचे खरे शिल्पकार’’ असं म्हणणं वावगं ठरणार नाही.या सर्व कर्मचार्‍यांना आमच्याकडून व मुरबाडकरांकडून मनःपूर्वक सलाम आणि मानाचा मुजरा!

 

 

 

No comments