web-banner-lshep2024

Breaking News

मुसळधार पावसाने मुरबाड तालुका हादरला; अनेक गावांचा संपर्क तुटला,प्रशासन सतर्क ;आमदार किसन कथोरे यांचा सातत्याने आढावा

 

कुणाल शेलार / मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.नद्यानाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक लहान मोठे पूल पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. घोरले,चासोळे,टोकावडा,चिखले परिसरासह अनेक गावांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.

सततच्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढल्याने पुलांवरून पाणी वाहू लागले.काही ठिकाणी रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.मुरबाड शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असली तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या.

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे देखील संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आवश्यक सूचना देत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पूरपरिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्यासह महसूल,पोलीस,आपत्ती व्यवस्थापन व इतर शासकीय यंत्रणा मुरबाड शहरात २४ तास सतर्क राहून मदतकार्य केले आहे.संभाव्य धोकादायक ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून गरज भासल्यास तातडीने मदत पोहोचविण्याची तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान,पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत उपस्थित असतानाही मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी तालुक्यातील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकारी,महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नागरिकांना तातडीने मदत मिळावी,पूरग्रस्त भागांवर विशेष लक्ष ठेवावे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विलंब न करता उपाययोजना कराव्यात,अशा स्पष्ट सूचना दिल्या.

मुरबाडसह बदलापूर,अंबरनाथ,भिवंडी,शहापूर आणि उल्हासनगर परिसरातील काही भागांमध्येही पावसाचा मोठा प्रभाव जाणवला. नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.

दुसरीकडे, सुरुवातीला पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीमुळे पिके आणि बियाण्यांच्या नुकसानीची चिंता निर्माण झाली आहे.तरीही गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

प्रशासनाने नागरिकांना विनाकारण पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून वाहतूक करू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा,असे आवाहन केले आहे.

No comments