web-banner-lshep2024

Breaking News

पडीचे घर कोसळून वृद्ध महिला जखमी; तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांची तत्पर धाव,उपचारामुळे जीव वाचला

 

कुणाल शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील मिल्हे येथील कोलेपाडा येथे पडीचे घर अचानक कोसळून एक वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत महिलेच्या डोक्याला दुखापत झाली.घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांनी कोणताही विलंब न करता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका तातडीने रवाना करण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर ते स्वतःही आरोग्य विभागातील डॉक्टर,कर्मचारी व संपूर्ण यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले.जखमी महिलेला तातडीने रुग्णवाहिकेतून तुळई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केल्याने तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

घर कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने पावसाचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिकृत तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.या संपूर्ण घटनेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांनी दाखविलेली तत्परता,आपत्कालीन परिस्थितीत केलेले नियोजन आणि आरोग्य यंत्रणेची जलद प्रतिसादक्षमता यामुळे जखमी महिलेवर वेळेत उपचार होऊन तिचा जीव वाचविण्यात यश आले.आपत्तीच्या प्रसंगी आरोग्य विभागाने दाखविलेली संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन नागरिकांसाठी दिलासादायक ठरले आहे.

No comments