पुन्हा बोकाळली नियमबाह्य प्रवासी वाहतूक! मुरबाड–कल्याण मार्गावरील काळी-पिवळी टॅक्सींत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी;प्रशासन पुन्हा झोपेत?
गौरव शेलार/मुरबाड: मुरबाड–कल्याण मार्गावर पुन्हा एकदा नियमबाह्य प्रवासी वाहतुकीचे चित्र समोर आले असून,प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.सात आसनी (7-सीटर) काळी-पिवळी टॅक्सीमध्ये तब्बल नऊ प्रवासी कोंबून प्रवास सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काही महिन्यांपूर्वी रायते पुलावर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सीचा भीषण अपघात झाला होता.त्या दुर्घटनेत अनेक निष्पाप प्रवाशांचा जीव गेला.या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवत विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती.काही काळ नियमांचे पालन होत असल्याचे दिसून आले.
मात्र,कालांतराने ही तपासणी मोहीम थंडावल्याने पुन्हा एकदा बेकायदेशीर प्रवासी वाहतूक जोमात सुरू झाल्याचे चित्र आहे.अनेक टॅक्सी चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करत असून,त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.विशेष म्हणजे,अनेक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म अथवा गडद टिंट असल्याचेही दिसून येते.त्यामुळे वाहनात किती प्रवासी आहेत,याची बाहेरून कल्पना येत नाही.याचाच गैरफायदा घेत काही चालक सर्रास अतिरिक्त प्रवासी भरून वाहतूक करत असल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून या प्रकाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, वाहतूक विभागाने पुन्हा एकदा विशेष तपासणी मोहीम राबवून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.आता मुरबाड–कल्याण मार्गावरील या नियमबाह्य प्रवासी वाहतुकीवर वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासन कोणती ठोस कारवाई करते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



No comments