"जनतेच्या सेवेसाठी झटणारे भिवंडी प्रशासन;उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजीत खोले यांच्या नेतृत्वाची सर्वत्र चर्चा"
कुणाल शेलार / भिवंडी : ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी उपविभागातील प्रशासनाने नागरिकाभिमुख,पारदर्शक आणि गतिमान कामकाजाची प्रभावी छाप पाडली आहे.उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या नेतृत्वाखाली तसेच भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले यांच्या समन्वयातून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभपणे मिळाव्यात,यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तहसील कार्यालयात दाखले,महसुली कामे,तक्रार निवारण,शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत. भिवंडी उपविभागातील अधिकारी/कर्मचारी सपना गोडांबे,तहसील कार्यालयातील श्री.म्हस्के भाऊसाहेब,सेतू केंद्रातील सोमनाथ धुमाळ,भूमी अभिलेख कक्ष विभागातील श्री.गायकवाड तसेच इतर अधिकारी-कर्मचारी नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याने कार्यालयात येणाऱ्या अनेक नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचत आहेत.
विशेषतःविद्यार्थ्यांना आवश्यक असलेले जात,उत्पन्न,अधिवास,रहिवासी यांसारखे विविध दाखले शक्य तितक्या कमी कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,प्रवेश प्रक्रिया किंवा शिष्यवृत्ती अर्जांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये,यासाठी संबंधित प्रकरणांवर प्राधान्याने कार्यवाही केली जात असल्याची माहिती नागरिकांकडूनही व्यक्त केली जात आहे.
तहसील कार्यालयात प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारींकडेही गांभीर्याने पाहिले जात असून प्रत्येक तक्रारीची वस्तुनिष्ठ पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाते.गोरगरीब,वंचित,ज्येष्ठ नागरिक,महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा,हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येते.नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी कार्यालयीन प्रक्रियेत सुलभता आणण्यावरही भर दिला जात आहे.
उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि तहसीलदार अभिजीत खोले नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेण्यावर भर देत असून त्यांच्या दालनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्येचे समाधान करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून प्रयत्न करत असल्याचे अनेक नागरिक सांगतात. त्यामुळे प्रशासनाविषयीचा सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात,यासाठी प्रशासनाने जनजागृतीवरही विशेष भर दिला आहे.विविध गावांमध्ये नागरिकांना योजनांची माहिती देणे,आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल यंत्रणा सक्रियपणे कार्यरत आहे.ज्येष्ठ नागरिकांची कामे प्राधान्याने मार्गी लावणे,दिव्यांग नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे,महिला आणि विद्यार्थ्यांना सुलभ सेवा देणे,तसेच कोणत्याही प्रकारची अनावश्यक दिरंगाई टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न नागरिकांच्या अनुभवातून अधोरेखित होत आहे.
कार्यक्षमता,पारदर्शकता,तत्परता आणि जनहिताची जाणीव या चार सूत्रांवर भिवंडी उपविभागातील प्रशासनाची वाटचाल सुरू असून,उपविभागीय अधिकारी अमित सानप,तहसीलदार अभिजीत खोले तसेच संपूर्ण अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या समन्वित कार्यामुळे भिवंडी प्रशासन हे सर्वसामान्य जनतेसाठी विश्वासाचे आणि न्यायाचे केंद्र बनत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



No comments