कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयासाठी आमदार किसन कथोरे यांचा जोरदार पाठपुरावा;लाखो नागरिकांना होणार दिलासा
कुणाल शेलार/कल्याण: ठाणे,रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील वाढत्या लोकसंख्येचा तसेच पासपोर्ट सेवांच्या वाढत्या गरजेचा विचार करून कल्याण येथे स्वतंत्र प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (Regional Passport Office) सुरू करण्यात यावे,अशी मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे.यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
सध्या ठाणे,रायगड,पालघर आणि आसपासच्या विस्तीर्ण भागातील नागरिकांना पासपोर्टशी संबंधित कामांसाठी मुंबईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयावर अवलंबून राहावे लागते.त्यामुळे अर्जदारांना मोठ्या प्रमाणात वेळ,पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात.विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक,ज्येष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थी,दिव्यांग आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या प्रक्रियेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आमदार कथोरे यांनी नमूद केले आहे.
कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यास कल्याण-डोंबिवली,भिवंडी,अंबरनाथ, बदलापूर,मुरबाड,शहापूर,नेरळ,कर्जत आणि परिसरातील लाखो नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे. या भागातील वाढते शहरीकरण,औद्योगिक विकास आणि परदेशात शिक्षण,रोजगार,व्यवसाय तसेच पर्यटनासाठी वाढणारी मागणी लक्षात घेता पासपोर्ट सेवा नागरिकांच्या अधिक जवळ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन कार्यालय सुरू झाल्यास पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया अधिक जलद,सुलभ आणि कार्यक्षम होईल.मुंबई व ठाणे येथील विद्यमान कार्यालयांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल,तसेच नागरिकांना वारंवार दूरचा प्रवास करण्याची गरज भासणार नाही.परिणामी शासनाच्या नागरिकाभिमुख सेवांची गुणवत्ता आणि गती दोन्ही वाढण्यास हातभार लागेल.
कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाची स्थापना झाल्यास ठाणे,रायगड व परिसरातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि शासनाच्या नागरिकाभिमुख सेवांना अधिक गती मिळेल,अशी भावना भारतीय जनता पक्षाचे कोकण विभाग आयटी सेल संयोजक तथा ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री.मिलिंद धारवाडकर यांनी व्यक्त केली.



No comments