अकोल्यात प्रतिबंधित गुटखा निर्मितीवर मोठा घाव; धाडीत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला/प्रतिनिधी : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि एमआयडीसी पोलिसांनी अकोला एमआयडीसी परिसरात संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याच्या अवैध उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली.या कारवाईत तयार गुटखा,पान मसाला,उत्पादनासाठी वापरला जाणारा कच्चा माल तसेच पॅकिंग यंत्रणा आणि इतर साहित्य असा सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.संबंधित कारखान्यात शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर नियोजनबद्ध सापळा रचून धाड टाकण्यात आली. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात तयार मालासह उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य आणि यंत्रसामग्रीही जप्त करण्यात आली.
प्राथमिक तपासात या अवैध कारखान्याचा संबंध गौरव शर्मा याच्याशी असल्याचे समोर आले असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींचाही शोध सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे.एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ गुन्हा दाखल करून कारवाई मर्यादित ठेवली जाणार नसून या अवैध रॅकेटचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी कठोर कायदेशीर पर्यायांचा विचार केला जात आहे. आवश्यक पुरावे उपलब्ध झाल्यास संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यांतर्गतही पुढील कारवाई होऊ शकते.
राज्यात अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध उत्पादन व विक्रीविरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे.त्याअंतर्गत विविध जिल्ह्यांत सातत्याने धाडी टाकून कारवाया सुरू असून,अकोल्यातील या मोठ्या कारवाईमुळे गुटखा तस्करी आणि अवैध उत्पादनाशी संबंधित टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.या रॅकेटमागील आर्थिक व्यवहार आणि इतर सहभागींचा शोध घेण्यासाठी पोलीस व एफडीएचे पथक पुढील तपास करत आहे.



No comments