मुरबाडच्या नव्या पुलाखाली सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील नव्याने
उभारण्यात आलेल्या पुलाखाली महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सार्वजनिक प्रसाधनगृह
उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ. योगिता अशोक शिर्के यांनी मुरबाड
नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद
केल्याप्रमाणे,
कल्याण–माळशेज मार्गावरील नवीन पुलाखालचा परिसर हा अत्यंत
वर्दळीचा असून या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी, चाकरमानी,
विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ
नागरिक तसेच रुग्णांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. मात्र या ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृहाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने
नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः महिला, लहान
मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास सहन
करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच स्वच्छतेच्या दृष्टीनेही
सार्वजनिक प्रसाधनगृहाची आवश्यकता असून त्याचा थेट परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होत
असल्याचेही शिर्के यांनी अधोरेखित केले आहे.
त्यामुळे नवीन पुलाखाली किंवा परिसरातील योग्य जागेवर महिला व
पुरुषांसाठी स्वतंत्र, स्वच्छ
आणि सर्व सुविधायुक्त सार्वजनिक प्रसाधनगृह तातडीने उभारण्यात यावे. तसेच
त्याच्या नियमित स्वच्छता व देखभालीसाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्याची
मागणीही करण्यात आली आहे.या मागणीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या हितासाठी
तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती सामाजिक
कार्यकर्त्या सौ. योगिता अशोक शिर्के
यांनी केली आहे.



No comments