web-banner-lshep2024

Breaking News

आमदार किसन कथोरे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मुरबाडसाठी ‘कृषी भवन’ची मागणी; शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सुविधांना मिळणार नवे बळ

 

कुणाल शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मुरबाड येथे सुसज्ज ‘कृषी भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सविस्तर निवेदन सादर करून प्रकल्पाला तातडीने प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या परिसरातील हजारो शेतकरी विविध कृषी व्यवहारांसाठी सातत्याने ये-जा करत असतात. मात्र, त्यांच्यासाठी मुक्काम, बैठक, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणारे स्वतंत्र केंद्र नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक सुविधांनी सुसज्ज कृषी भवन उभारण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे.

प्रस्तावित कृषी भवनामध्ये शेतकरी प्रशिक्षण केंद्र, सभागृह, निवास व्यवस्था, विश्रांतीगृह, कृषी मार्गदर्शन कक्ष तसेच विविध शासकीय कृषी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

या प्रकल्पासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, तसेच संबंधित विभागांकडून आवश्यक अहवाल व अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यात यावी,अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीमुळे मुरबाडसह आसपासच्या तालुक्यांतील कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल,शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि कृषी विकासाला चालना मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments