मुरबाडमध्ये गुटखा रॅकेट पुन्हा सक्रिय? गोदाम, मोठा साठा आणि वाढलेले दर; चर्चांनी घेतला जोर
कुणाल शेलार / मुरबाड : मुरबाड शहरात पुन्हा एकदा अवैध गुटखा विक्रीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही शहरात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याच्या चर्चेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, काही काळ शांत असलेले कथित गुटखा डीलर पुन्हा सक्रिय झाले आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा ठेवण्यासाठी गोदाम असल्याच्याही चर्चा रंगत आहेत. एवढेच नव्हे तर लाखो रुपयांच्या मालाची उलाढाल होत असल्याचाही संशय नागरिक व्यक्त करत आहेत. या चर्चांची सत्यता तपासणे आता संबंधित यंत्रणांसाठी अत्यावश्यक बनले आहे.
शहरात पूर्वी १५ ते २० रुपयांना मिळणारे काही गुटखा पाऊच आता तब्बल ८० रुपयांपर्यंत विकले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून अवैध नफा कमावला जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, या अवैध व्यवहारामागे मुरबाड शहरातीलच काही व्यक्ती सक्रिय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे प्रशासनाच्या निष्पक्ष तपासातूनच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे संबंधित व्यक्तींची नावे चर्चेत असली तरी अधिकृत चौकशी होईपर्यंत कोणावरही ठपका ठेवणे योग्य ठरणार नाही.
शहरभर या विषयावर उघडपणे चर्चा होत असताना संबंधित गुप्तचर यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलीस यंत्रणांना याची माहिती आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. जर माहिती असेल तर कारवाई का होत नाही, आणि माहिती नसेल तर गुप्त माहिती संकलन यंत्रणा नेमकी कार्यरत आहे का, अशीही चर्चा रंगली आहे.
मुरबाडमध्ये गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, संभाव्य गोदामांची तपासणी करावी, संशयित पुरवठा साखळीचा शोध घ्यावा आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी ठोस मागणी आता नागरिकांकडून होत आहे. चर्चांना पूर्णविराम देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निष्पक्ष चौकशी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई, अशी भावना व्यक्त होत आहे.



No comments