web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या वेदांत सोनोग्राफी सेंटरला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

 

कुणाल शेलार/मुरबाड: मुरबाड शहरातील पोद्दार शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या वेदांत सोनोग्राफी सेंटरला मंगळवार, दि. 14 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली.प्राथमिक माहितीनुसार,शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून,या दुर्घटनेत कागदपत्रे व इतर वैद्यकीय साहित्य जळून खाक झाले आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती डॉ.महेंद्र बेंढारी यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील सुज्ञ नागरिकांनी तत्काळ मुरबाड नगरपंचायतीला कळविले.नगरपंचायतीनेही तातडीने अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी रवाना केले.अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

मुरबाड तालुक्यातील नागरिकांसाठी वेदांत सोनोग्राफी सेंटर हे अत्यंत महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र मानले जात होते.अनेक वर्षांपासून डॉ.महेंद्र बेंढारी यांनी सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार व विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून दिली होती.विशेषतःग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे केंद्र मोठा आधार ठरले होते.

या आगीत सोनोग्राफी यंत्रणा निकामी झाल्याने सध्या मुरबाड तालुक्यात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिकांना आता तपासणीसाठी टिटवाळा किंवा इतर तालुक्यांमध्ये जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान,या घटनेनंतर "वेदांत सोनोग्राफी सेंटर पुन्हा केव्हा सुरू होणार?" हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.मुरबाडकरांना पुन्हा एकदा ही अत्यावश्यक आरोग्यसेवा पूर्ववत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

 

No comments