web-banner-lshep2024

Breaking News

गरीबांच्या शिक्षणासाठी आयुष्य वाहिले; पंढरीनाथ टोले सरांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा

कुणाल शेलार / मुरबाड : आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमातील शिक्षण अनेक सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जात असताना, मुरबाड तालुक्यातील रेनबो सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक तथा प्राचार्य पंढरीनाथ बुधाजी टोले सर यांनी शिक्षणाला समाजसेवेचे माध्यम मानत गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य उभे केले आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहू नये, ही भूमिका कायम ठेवत टोले सरांनी अत्यंत माफक शुल्कात दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून दिले. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मजूर, रिक्षाचालक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी मिळाली आहे.

टोले सरांचा विश्वास नेहमीच एका विचारावर राहिला आहे—"विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक दिले तर त्यांच्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते." त्यामुळे त्यांनी केवळ शाळा उभी केली नाही, तर संस्कार, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडवणारे शैक्षणिक वातावरण निर्माण केले.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अनुभवी शिक्षकांची फळी, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम यामुळे ही संस्था पालकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी टोले सर सातत्याने प्रयत्नशील आहेत.

यावर्षीही शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून संस्थेची शैक्षणिक परंपरा कायम राखली. मात्र या यशामागे केवळ गुण नसून, टोले सरांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेली मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि संस्कार हीच खरी ताकद असल्याचे पालक आणि शिक्षक सांगतात.

विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता टोले सर नेहमी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना देतात. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जावे, अशी प्रेरणा ते सातत्याने देत असतात.

आज रेनबो सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून गरीबांच्या मुलांना सक्षम,सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे सामाजिक अभियान बनली आहे.पंढरीनाथ बुधाजी टोले सर यांच्या दूरदृष्टी,सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणावरील निष्ठेमुळे ही संस्था मुरबाड तालुक्यातील अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत असून, शिक्षण क्षेत्रात एक प्रेरणादायी आदर्श म्हणून ओळख निर्माण करत आहे.

 

No comments