कल्याण–मुरबाड–माळशेज घाट महामार्ग धोक्याच्या छायेत; पाणी साचणे, दरडी, झाडे आणि निकृष्ट कामांमुळे प्रवाशांमध्ये भीती
नामदेव शेलार/मुरबाड : पावसाळ्याच्या
सुरुवातीलाच कल्याण–मुरबाड–माळशेज घाट महामार्गावरील विविध धोकादायक बाबी पुन्हा
एकदा समोर आल्या असून, वाहनचालक आणि
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांबा गावातील पेट्रोल पंपासमोर
महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून
अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, हा प्रश्न दरवर्षी
उद्भवत असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात
आलेल्या नाहीत, अशी नागरिकांची नाराजी आहे.
मुरबाड–कल्याण आणि माळशेज घाट मार्गावरील अनेक ठिकाणी
रस्त्यालगतची मोठी झाडे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. सततच्या पावसामुळे माळशेज
घाटात दरडी कोसळण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी आवश्यक
प्रतिबंधात्मक उपाय,धोकादायक झाडांची
छाटणी,दरड प्रतिबंधक कामे किंवा आपत्कालीन यंत्रणा सक्षम
करण्याबाबत पुरेशी तयारी झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
मुरबाड शहरातील मुख्य पुलावर पडलेल्या भेगा तसेच पुलाच्या
संरक्षण भिंतींची झालेली पडझड यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे
शहरातील प्रमुख नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने मुसळधार पावसात वाहतूक
विस्कळीत होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला असला, तरी अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट काँक्रीट तर
अर्धवट डांबरी असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विसंगत
कामामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अनेकांनी या मार्गाला "मृत्यूचा सापळा" अशी उपमा दिली आहे.
दरम्यान, माळशेज घाट रस्त्यावर मुरबाड-सरळगांव-माळशेज घाट एकेरी वाहतूक असताना टोल आकारणारी कोणत्या कायदेशीर मार्गा ने करणार आहेत यांचे उत्तर अधिकारी देत नाहीत,सततच्या पावसामुळे महामार्गावरील अनेक भागांत पाणी साचत असून,पावसाचा जोर वाढल्यास काही मार्ग तात्पुरते बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने धोकादायक ठिकाणांची पाहणी करून झाडांची छाटणी, दरड प्रतिबंधक उपाय, जलनिस्सारण व्यवस्था आणि पुलांच्या सुरक्षिततेची तपासणी करण्याची मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.दरवर्षी पावसाळ्यात समस्या निर्माण झाल्यानंतरच यंत्रणा जागी होते. मात्र यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.




No comments