web-banner-lshep2024

Breaking News

कडेकोट बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला सुरुवात! लाखो भाविक अमरनाथमध्ये दाखल

गौरव शेलार / श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बहुप्रतिक्षित अशा बाबा बर्फानीं अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. 2 जुलैपासून यात्रा सुरू झाली असून मुरबाड वरून भाविकभक्त यात्री निवास बेस कॅम्पमधून दर्शनासाठी रवाना होत आहेत. यावेळी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. इथून पुढं 57 दिवसांपर्यंत ही अमरनाथ यात्रा सुरूच राहणार आहे.

जम्मूहून भाविकांची पहिली तुकडी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत निघाली. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफची वाहने त्यांच्या वाहनांना संरक्षण देत आहेत. यात्रेकरूंच्या ताफ्याच्या पुढे आणि मागे सीआरपीएफच्या ताफ्यातून ही यात्रा सुरक्षितपणे पार पडत आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी, यात्रेच्या ताफ्यात सामील होणाऱ्या सर्व सरकारी आणि खाजगी वाहनांची सुरक्षा तपासणी केल्यानंतरच ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनाला सुरक्षा तपासणी टॅग लावण्यात आले आहेत. यंदाची श्री अमरनाथ यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. 57 दिवसांची ही यात्रा रक्षाबंधनपर्यंत सुरू राहील, यात्रेकरूंना पारंपरिक पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांनी जात बाबा बर्फानींचे दर्शन घेता येईल.

यात्रेकरूंच्या सोयीसाठी, जम्मू सहित संपूर्ण तीर्थयात्रा मार्गावर निवास, भोजन, वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि मदत कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने यात्रेकरूंना विहित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे, केवळ नोंदणी आणि आरएफआयडी कार्डांसह प्रवास करण्याचे आणि प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षित आणि सुरळीत यात्रा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. जम्मूपासून पवित्र गुहेपर्यंत बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये लष्कर, केंद्रीय निमलष्करी दल, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा तैनात करून कडक पहारा ठेवला जाईल. यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनविरोधी यंत्रणा आणि आधुनिक निगराणी उपकरणांचाही वापर केला जाईल.

अमरनाथ यात्रेत दरवर्षी नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या बर्फाच्या शिवलिंग दर्शनासाठी हिमालयाच्या दुर्गम खोऱ्यांमध्ये असलेल्या पवित्र गुहेला लाखो भाविक भेट देतात. यावर्षीही अमरनाथ यात्रेत विक्रमी संख्येने यात्रेकरू सहभागी होतील अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.

No comments