खराब हवामानाच्या अंदाजामुळे आजपासून पुढील आदेशापर्यंत अमरनाथ यात्रा स्थगित
जम्मू: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर
अधिकाऱ्यांनी रविवारपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी वार्षिक
श्रीअमरनाथजी यात्रा तात्पुरती स्थगित केलीय. हवामान विभागाने जम्मू-काश्मीरमध्ये
पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पवित्र गुहेच्या दर्शनासाठी
जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून
शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. एका अधिकृत निवेदनानुसार, 19 जुलैपासून यात्रा स्थगित केली
जाणार आहे. निवेदनात म्हटले आहे की, "पुढील काही
दिवसांतील खराब हवामानाचा अंदाज आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता पहलगाम आणि
बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्रीअमरनाथजी यात्रा 19 जुलै 2026 पासून तात्पुरती स्थगित केली जाणार
आहे."
काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितले की, रविवारपासून बालताल आणि
नुनवान-चंदनवारी बेस कॅम्पवरून भाविकांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, हवामान परिस्थितीचा सखोल आढावा
घेतल्यानंतर आणि दोन्ही मार्ग प्रवासासाठी सुरक्षित असल्याचे घोषित केल्यानंतरच
यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. आढावा घेतल्यानंतर नवीन माहिती दिली जाईल.
श्रीनगरमधील हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या
हवामानविषयक सल्ल्यानंतर ही स्थगिती जाहीर करण्यात आली आहे. या सल्ल्यात 19
जुलै ते 23 जुलै या कालावधीत जम्मू-काश्मीर
आणि लगतच्या भागात दीर्घकाळ पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या सल्ल्यानुसार, या कालावधीत केंद्रशासित प्रदेशात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह
पावसाची शक्यता आहे. काश्मीर विभागात 21 जुलै ते 23 जुलै दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू विभागातील
काही भागांत, विशेषतः रियासी आणि उधमपूर जिल्ह्यांमध्ये 20
जुलै ते 23 जुलैदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार
पाऊस पडू शकतो; तसेच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचीही
शक्यता आहे.
हवामान विभागाने सांगितले की, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारा ओलावा
आणि मान्सूनचा पट्टा (ट्रफ) जम्मूच्या दिशेने सरकणे यांमुळे ही हवामान प्रणाली
तयार झाली आहे. या सूचनेनुसार, सततच्या पावसामुळे संवेदनशील
भागांमध्ये विशेषतः पीर पंजाल पर्वतरांग आणि काश्मीरमधील उंच प्रदेशांत (जसे की
अनंतनाग, पहलगाम, कुलगाम, शोपियान, गुलमर्ग, सोनमर्ग-झोझिला
मार्ग, बांदीपोरा-रझदान खिंड आणि कुपवारा-साधना खिंड)
भूस्खलन, चिखलाचे लोंढे (मडस्लाईड्स), दरडी
कोसळणे आणि अचानक पूर येणे (फ्लॅश फ्लड्स) यांसारख्या घटना घडू शकतात. हवामान
खात्याने खराब हवामानामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि इतर प्रमुख
रस्त्यांवरील वाहतुकीसह जमिनीवरील दळणवळणात व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली आहे.
नद्या, ओढे आणि उप-खोऱ्यांमधील पाणी पातळी वाढण्याचा इशाराही
देण्यात आला आहे, ज्यामुळे सखल भागात पाणी साचणे आणि किरकोळ
पूर येण्याचा धोका वाढू शकतो.
प्रवासी आणि पर्यटकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक
करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उंच भागातील रहिवाशांना भूस्खलनाचा धोका असलेल्या
क्षेत्रांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हवामानाचा अंदाज
असलेल्या कालावधीत खते आणि रासायनिक फवारण्यांचा वापर थांबवण्याचा सल्ला
शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. दिवसाच्या तापमानातही लक्षणीय घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात
आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीची यात्रा सुरू झाल्यापासून 3.70 लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुहेतील पवित्र स्थळाला भेट दिली आहे.
प्रशासनाने भाविकांना हवामानाबाबतच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्यास आणि यात्रा
पुन्हा सुरू करण्याबाबतच्या पुढील घोषणेची वाट पाहण्यास सांगितले आहे.



No comments