web-banner-lshep2024

Breaking News

जंतर-मंतर आंदोलनाला मुरबाडमध्ये पाठिंबा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) चे धरणे आंदोलन, तहसीलदारांना निवेदन

 

गौरव शेलार / मुरबाड : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)च्या वतीने रविवारी मुरबाड तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आंदोलनानंतर तहसीलदारांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सांगितले की, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण दलित, आदिवासी व बहुजन विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणारे असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले की, या धोरणाच्या विरोधात पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले असून, प्रख्यात शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनात सहभागी होत आमरण उपोषण सुरू केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, आंदोलनाकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आंदोलनातील संयोजक, उपोषणकर्ते आणि विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध नोंदविला.

यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करत शासनाच्या कथित असंवैधानिक, जुलमी व लोकशाहीविरोधी कृत्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच जंतर-मंतरवरील आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आंदोलनाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन करण्यात आले.

या आंदोलनात संतोष विशे, कृष्णकांत तुपे, चेतनसिंह पवार, शरद पाटील, दीपक वाकचौरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर मुरबाड तहसीलदार यांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.

 

No comments