web-banner-lshep2024

Breaking News

“यशाचा मंत्र’’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला;रेनबो सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रेरणादायी मार्गदर्शन व्याख्यान

 

कुणाल शेलार / मुरबाड : "यशस्वी होण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून योग्य नियोजन, सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्‍वास आणि वेळेचे प्रभावी व्यवस्थापन हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे," असा प्रेरणादायी संदेश देत आंतरराष्ट्रीय ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ श्री.प्राजेश ट्रॉट्स्की यांनी रेनबो सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला.

शुक्रवार, दि. 10 जुलै 2026 रोजी रेनबो सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी टशडक्ष् TEDx Speaker, Certified NLP Trainer, Certified Graphologist तसेच NTS Edusys संचालक श्री.प्राजेश ट्रॉट्स्की प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.शिक्षण आणि मानव विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना बहाल करण्यात आलेल्या UNESCO International Ambassador Award मुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख निर्माण झाली आहे.

        कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सर यांनी श्री. ट्रॉट्स्की यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांची गरज अधोरेखित केली.मार्गदर्शन करताना श्री.ट्रॉट्स्की यांनी प्रभावी अभ्यासपद्धती,स्मरणशक्ती वाढविण्याच्या आधुनिक अध्ययन तंत्रांचा वापर,परीक्षेची वैज्ञानिक पद्धतीने तयारी,वेळेचे नियोजन,उत्तरपत्रिका लेखनातील महत्त्वाच्या बाबी तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या सवयी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना भीती आणि तणावावर मात करून आत्मविश्‍वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांनी पालकांनाही महत्त्वपूर्ण संदेश देत,घरामध्ये सकारात्मक आणि अभ्यासपूरक वातावरण निर्माण करणे, मुलांवर अनावश्यक दबाव न टाकता त्यांना प्रोत्साहन देणे आणि मानसिक आधार देणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.संपूर्ण व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्‍न विचारले.श्री.ट्रॉट्स्की यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचे सोप्या आणि प्रेरणादायी शैलीत निरसन केले. त्यांच्या ओघवत्या व प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयीचा आत्मविश्‍वास वाढला असून, नियोजनबद्ध अभ्यास करण्याची नवी ऊर्जा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या प्रेरणादायी मार्गदर्शन व्याख्यानास शाळेतील शिक्षक,विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉईस प्रिंसीपल सौ.सीमा पाटील (माध्यमिक विभाग),सुत्र संचालन व्हॉईस प्रिंसीपल कु.मेघना घरत (प्राथमिक विभाग),तर आभार प्रदर्शन व्हॉईस प्रिंसीपल सौ.विद्दया मोकाशी (पूर्व प्राथमिक विभाग) यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले.

No comments