मुरबाडच्या नव्या उड्डाणपुलाला 'वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील' यांचे नाव देण्याची मागणी
गौरव
शेलार / मुरबाड : मुरबाड
शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला स्वातंत्र्यसंग्रामातील
क्रांतिकारक वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील
यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक अशोक
वाघचौडे यांनी केली आहे.
आज
मुरबाड येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्राताई अजितदादा पवार या उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी दीपक
वाघचौडे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नव्या उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबतचे
सविस्तर निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले.
निवेदनात
कल्याण–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड येथील नव्याने उभारण्यात
आलेल्या उड्डाणपुलाला "वीर हुतात्मा भाई
कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील उड्डाणपूल" असे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुरबाड परिसराचा
स्वातंत्र्यलढ्याशी असलेला ऐतिहासिक संबंध लक्षात घेता या दोन्ही
स्वातंत्र्यवीरांचे योगदान अमूल्य असून, त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि भावी पिढीला त्यांच्या त्यागातून
प्रेरणा मिळावी, यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे
निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ब्रिटिश
सत्तेविरोधातील लढ्यात वीर हुतात्मा भाई कोतवाल यांनी ग्रामीण भागात
स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचे कार्य केले, तर वीर हुतात्मा हिराजी पाटील यांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी
आपल्या प्राणांची आहुती दिली. या दोन्ही क्रांतिकारकांच्या बलिदानाचा सन्मान
म्हणून सार्वजनिक वास्तूंना त्यांची नावे देणे हीच खरी आदरांजली ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी
उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी निवेदन स्वीकारले
असून, शासन स्तरावर
सकारात्मक विचार व्हावा, अशी अपेक्षा दीपक वाघचौडे यांनी
व्यक्त केली. मुरबाड तालुक्यातील नागरिकांमधूनही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
मिळत असल्याचे बोलले जात आहे.



No comments