ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या नेतृत्वासमोर ‘विश्वास पुनर्स्थापने’चे मोठे आव्हान
गौरव शेलार / ठाणे : ठाणे जिल्हा
मध्यवर्ती सहकारी (टीडीसी) बँकेच्या अध्यक्ष व संचालकपदी नवनिर्वाचित
पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असताना, त्यांच्या खांद्यावर
बँकेची प्रतिमा उंचावण्याची मोठी जबाबदारीही येऊन पडली आहे. अनेक वर्षांपासून
विविध गैरव्यवहार, आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय
त्रुटींमुळे चर्चेत राहिलेल्या या बँकेबाबत आता नवे नेतृत्व कोणती भूमिका घेणार,
याकडे सभासदांसह ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेच्या कारभाराबाबत विविध गंभीर आरोप समोर आले आहेत. भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता, बनावट
सोनेतारण प्रकरण, आर्थिक व्यवहारांतील त्रुटी, नियमांचे कथित उल्लंघन आणि त्यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI)
करण्यात आलेल्या कारवायांमुळे बँकेची प्रतिमा अनेकदा
प्रश्नचिन्हाखाली आली होती. विविध स्तरांवर तक्रारी, चौकशी
आणि दंडात्मक कारवाईच्या घटनाही चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
अशा पार्श्वभूमीवर नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व
संचालक मंडळाकडून पारदर्शक प्रशासन, आर्थिक शिस्त आणि उत्तरदायी
कारभाराची अपेक्षा व्यक्त होत आहे. बँकेतील प्रलंबित प्रश्न सोडविणे, आर्थिक व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, गैरव्यवहारांना
आळा घालणे आणि ठेवीदार व सभासदांचा विश्वास पुन्हा संपादन करणे हे नव्या
नेतृत्वासमोरील सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे.
सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था असलेल्या ठाणे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यापुढे वादांऐवजी विश्वास, पारदर्शकता
आणि शिस्तीचा नवा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त
केली जात आहे. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती, त्यांनी
राबविण्यात येणारे सुधारणा उपक्रम आणि आर्थिक गैरव्यवहारांबाबत घेतली जाणारी
भूमिका यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.



No comments