वारीच्या भक्तिमय वातावरणात आमदार किसन कथोरे; विठ्ठल चरणी समाजकल्याणासाठी केली प्रार्थना
कुणाल शेलार/पंढरपूर : महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदाही लाखो वारकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदविला. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शांततेसाठी प्रार्थना केली.
वारी हा केवळ पायी चालण्याचा धार्मिक प्रवास नसून तो समाजात समता, सेवा, संयम आणि बंधुभावाची शिकवण देणारा जीवनोत्सव असल्याचे मत आमदार कथोरे यांनी व्यक्त केले. वारकरी संप्रदायाची शिस्त, साधेपणा आणि अखंड नामस्मरणाची परंपरा प्रत्येकाला जीवनात सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात सहभागी होताना समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
वारीमध्ये जात, धर्म, पंथ किंवा आर्थिक स्तराचा कोणताही भेद न ठेवता सर्वजण एकाच भावनेने विठ्ठलभक्तीत रंगून जातात. हीच महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख असून मानवतेचा संदेश देणारी ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.दर्शनानंतर आमदार कथोरे यांनी विठुरायाच्या चरणी राज्यातील प्रत्येक कुटुंब सुखी राहो, शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि आरोग्य नांदो तसेच समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थना केली.

.jpeg)



No comments