बदलापूरकर प्रवाशांच्या प्रतीक्षेला अखेर यश; १५ डब्यांच्या लोकलला हिरवा कंदील ; आमदार किसन कथोरे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
कुणाल शेलार/बदलापूर: बदलापूर ते मुंबई दरम्यान दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच विविध कारणांसाठी प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा निर्णय अखेर रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या १५ डब्यांच्या लोकल गाड्यांच्या मागणीला मंजुरी मिळाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निर्णयाबद्दल आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले. बदलापूर शहराचा झपाट्याने विस्तार होत असून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विद्यमान रेल्वे सेवांवर मोठा ताण निर्माण झाला होता. १५ डब्यांच्या लोकल सुरू झाल्यानंतर प्रवासी क्षमतेत वाढ होईल, गर्दी कमी होईल आणि दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व आरामदायी होण्यास मोठी मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार कथोरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विशेष आभार व्यक्त करत, प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या निर्णयाचे स्वागत केले. भारतीय रेल्वे प्रवासी सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करत असून भविष्यात बदलापूरसह ठाणे जिल्ह्यातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भाजपा कोकण विभाग आयटी सेल संयोजक तथा ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे उपाध्यक्ष मिलिंद धारवाडकर यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. बदलापूरकर नागरिकांनी, विशेषतः दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांनी अनेक वर्षे संयम राखत ही मागणी सातत्याने लावून धरली. त्यांच्या संयमामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळेच हा महत्त्वपूर्ण निर्णय साकार झाला असून त्याबद्दल प्रवाशांचेही कौतुक व्हायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.१५ डब्यांच्या लोकल गाड्यांना मंजुरी मिळाल्याने बदलापूर ते मुंबई मार्गावरील दैनंदिन प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून लाखो प्रवाशांना याचा थेट लाभ होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



No comments