सौ.कमलताई किसन कथोरे महाविद्यालयात वृक्षारोपणाचा हरित संकल्प; ८० हून अधिक रोपांची लागवड
कुणाल शेलार/मुरबाड :पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने जीवनदीप शैक्षणिक संस्था, पोई संचालित सौ. कमलताई किसन कथोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हसा येथे शनिवारी (दि. १८ जुलै) उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
महाविद्यालयातील ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि DLLE यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. परिसर अधिक हिरवागार करण्याच्या संकल्पातून महाविद्यालय परिसरात सुमारे ७० ते ८० विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपण मोहिमेत आंबा, पेरू, जांभूळ, चिकू, सीताफळ, लिंबू, नारळ यांसारख्या फळझाडांसह सोनचाफा, चाफा, गुलाब, शेवंती, कण्हेर आणि विविध शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रत्येक रोप भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ, हिरवेगार वातावरण मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश माळी, सर्व विभागप्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रीन क्लब, NSS व DLLE मधील स्वयंसेवक आणि इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यविषयक महत्त्व समजावून सांगत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे,संचालिका सौ.स्मिता घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.पर्यावरण संरक्षण ही केवळ जबाबदारी नसून भावी पिढीला दिलेली अमूल्य भेट आहे, हा संदेश या वृक्षारोपण उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.



No comments