web-banner-lshep2024

Breaking News

शाळांजवळ ५० मीटर परिसरात 'जंक फूड' विक्रीवर बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई

 

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये सकस आहाराच्या सवयी रुजाव्यात आणि शालेय परिसरातील अपायकारक खाद्यपदार्थांवर आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांच्या आवारात तसेच शाळेच्या कंपाऊंडपासून ५० मीटरच्या परिसरात जास्त चरबी, मीठ आणि साखर असलेले प्रक्रिया केलेले, पॅकेज्ड खाद्यपदार्थ तसेच साखरयुक्त पेयांच्या विक्री, जाहिरात आणि मोफत वाटपावर बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा एफडीएने दिला आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शाळांना अन्नपुरवठा करणारे कँटीन चालक, स्वयंपाकगृहे, मध्यान्ह भोजन योजनेतील स्वयंपाकगृहे, वसतिगृहातील भोजन व्यवस्था आणि अन्नपुरवठादार यांच्याकडे अन्नसुरक्षा नियमांनुसार वैध नोंदणी आणि परवाना असणे बंधनकारक राहणार आहे. परवाना किंवा नोंदणी नसताना कोणतीही संस्था अथवा संघटना शाळा, वसतिगृह किंवा मध्यान्ह भोजन योजनेसाठी अन्न तयार करू अथवा पुरवू शकणार नाही.

राज्य सरकारने २७ जुलै रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये अन्नसुरक्षा व पोषणविषयक निकषांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पालन आदेश जारी केला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे १.०८ लाख शाळांमधील जवळपास दोन कोटी विद्यार्थ्यांना होणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

ही नियमावली राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित तसेच कोणत्याही शिक्षण मंडळाशी संलग्न खासगी शाळांवर लागू राहणार असून, कोणत्याही शैक्षणिक संस्थेला या नियमांमधून सूट मिळणार नाही. तसेच, २२ महिन्यांच्या बालकांपासून ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही तरतूद लागू राहणार आहे.

एफडीएच्या नव्या नियमांनुसार शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूडची विक्री, जाहिरात किंवा मोफत वाटप पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि स्थानिक प्रशासन यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

 

No comments