मुरबाड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली अतिक्रमणांमुळे अपघाताचा धोका;तातडीने कारवाईची नागरिकांची मागणी
गौरव शेलार / मुरबाड
:
मुरबाड नगरपंचायत हद्दीतील प्रमुख रस्ते, सार्वजनिक
फुटपाथ, गटारी आणि शासकीय भूसंपादित जमिनींवर कथित
अतिक्रमणांचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच गंभीर अपघातांचा धोका
वाढल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने
तातडीने संयुक्त पाहणी करून नियमबाह्य अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांच्या
म्हणण्यानुसार,
जुना पेट्रोल पंप ते झुंजारराव कॉम्प्लेक्स, नॅशनल
बँक परिसर, नवीन गॅस पेट्रोल पंप, पटेल
मॉल, लोखंड विक्री दुकान परिसर, गणेश
कृपा सॉमिल, वनविभाग कार्यालय, राकेश
शहा इमारतीलगतचा परिसर, एसटी बसस्थानक ते म्हसा रोड नाका,
एचपी गॅस कार्यालय परिसर तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली आणि
दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याशिवाय, संतोशी
माता मंदिर ते गजानन गॅस एजन्सी तसेच मुरबाड एमआयडीसीकडे जाणाऱ्या म्हसा रोडवरील
प्रमुख नाल्यालगतही कथित अतिक्रमणे झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे
पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडथळला जात असल्याचीही तक्रार करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, शासनाच्या
निधीतून उभारण्यात आलेल्या गटारी, सार्वजनिक फुटपाथ आणि
रस्त्यांच्या कडेला अतिक्रमण झाल्याचा आरोप होत असून, त्यामुळे
पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी
मुरबाड नगरपंचायत,
सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि
संबंधित शासकीय यंत्रणांनी संयुक्त सर्वेक्षण करून नियमबाह्य अतिक्रमणे तातडीने
हटवावीत, तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी
कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.आता या
गंभीर प्रकरणाची संबंधित प्रशासन दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कारवाई
करणार का, याकडे संपूर्ण मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.



No comments