कल्याण–मुरबाड रेल्वे मार्गाला वेग ;१८ गावांतील १५१ हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू...
नामदेव शेलार / मुरबाड : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कल्याण–मुरबाड नवीन रेल्वे मार्गाच्या स्वप्नाला अखेर प्रत्यक्ष गती मिळू लागली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, १८ गावांतील सुमारे १५१ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, बाधित जमीनधारकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
सुमारे
२८ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग कल्याण आणि मुरबाड दरम्यानची वाहतूक
अधिक जलद व सुरक्षित करणार आहे. या मार्गामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मुंबई
महानगराशी थेट रेल्वे संपर्क मिळणार असून, रोजच्या प्रवासासाठी लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा
व्यक्त केली जात आहे.
- २८ किमी लांबीचा नवीन
कल्याण–मुरबाड रेल्वे मार्ग.
- १८ गावांतील सुमारे १५१ हेक्टर
जमिनीचे संपादन.
- जमीनधारकांना हरकती
नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत.
- ग्रामीण भागाला रेल्वे
संपर्कामुळे विकासाला नवी दिशा.
- दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकल्पाच्या
अंमलबजावणीला आता वेग
हा रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांची
प्रमुख मागणी होती. रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण, अपघातांचे
प्रमाण आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात
आहे. आता जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात
होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रकल्प
पूर्ण झाल्यानंतर मुरबाड तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागाच्या विकासाला नवी
चालना मिळेल, उद्योग-व्यवसाय,
शिक्षण, रोजगार आणि पर्यटनाच्या संधी वाढतील,
तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



No comments