ग्रामीण रुग्णालयातही चोरट्यांचा शिरकाव; जनरेटरच्या दोन बॅटऱ्या चोरीला, रुग्णसेवेवर परिणाम...
कुणाल शेलार / मुरबाड : मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात चोरट्यांनी थेट जनरेटरवरच डल्ला मारत दोन बॅटऱ्या चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याच ठिकाणी यापूर्वीही जनरेटरच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने ही दुसऱ्यांदा घडलेली चोरी असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या जनरेटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन बॅटऱ्या लंपास केल्या. विशेष म्हणजे जनरेटर परिसरात कोणतेही कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचे दिसून आले आहे.
बॅटऱ्या चोरीला गेल्यामुळे जनरेटर सुरू होऊ शकले नाही. परिणामी काल ग्रामीण रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरचा पर्याय उपलब्ध नसल्याने रुग्णालय अंधारात राहिला. यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह डॉक्टर व कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. रुग्णसेवेसाठी अत्यावश्यक असलेली यंत्रणा ठप्प झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जनरेटरच्या बॅटऱ्या यापूर्वीही चोरीला गेल्या होत्या.त्या वेळीही संबंधित विभागांकडे पत्रव्यवहार करून तपासाची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नसतानाच पुन्हा ही चोरी घडल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने चोरटे निर्धास्तपणे चोरी करून पसार झाल्याची चर्चा असून, नेमकी रुग्णालयातील जनरेटरमध्ये बॅटऱ्या असल्याची माहिती चोरट्यांना कशी मिळाली, यामागे कोणाचा हात आहे का, चोरीच्या बॅटऱ्यांची विक्री कुठे केली आहे का,अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.
दरम्यान,मुरबाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली अज्ञात चोरट्यांचा शोध मुरबाड पोलिसांनी तात्काळ घ्यावा.ग्रामीण रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय आरोग्य संस्थेतच चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, चोरट्यांना तातडीने जेरबंद करून रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही व कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
"ग्रामीण रुग्णालयातील जनरेटरच्या बॅटऱ्यांचा चोर अखेर कोण?" हा प्रश्न आता मुरबाडकरांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.



No comments