मुरबाडच्या माळशेज घाटात ७० हजार पर्यटकांचा लोंढा; दारुड्यांचा धिंगाणा, वाहनांच्या रांगा अन् वाहतूक कोंडी!
गौरव शेलार /
मुरबाड : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध
असलेल्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात यंदा पर्यटकांची मोठी गर्दी होत असून,
तब्बल ७० हजारांहून अधिक पर्यटकांनी घाट परिसरात
हजेरी लावल्याचे चित्र आहे. मात्र, या गर्दीसोबतच वाहतूक
कोंडी, रस्त्यावर उभी असलेली पर्यटकांची वाहने, मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा आणि धबधब्यांच्या ठिकाणी होणारी गर्दी यामुळे
माळशेज घाटातील पर्यटन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काळू धबधबा परिसरात
नुकतेच दोन पर्यटकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने प्रशासनाने या परिसरात
पर्यटकांना बंदी घातली आहे. तरीदेखील काही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाण्याचा
प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, माळशेज घाटातील रस्त्यांवरच
पर्यटकांची वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावून अनेक ठिकाणी प्रचंड
वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
भरपावसात
रस्त्यालगतचे धबधबे आणि पाण्याचे प्रवाह पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असले, तरी
याच ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याने हे धबधबे आता जीवघेणे
ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या
पर्यटकांमुळे महिला, कुटुंबे आणि इतर पर्यटकांनाही त्रास सहन
करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
दोन पर्यटकांचा
मृत्यू होऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नसल्याने पर्यटकांचा
धिंगाणा रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज
निर्माण झाली आहे. गर्दीच्या काळात वाहनतळाची व्यवस्था, वाहतूक
नियंत्रण, मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई आणि धोकादायक
धबधब्यांवर कडक बंदोबस्त याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पर्यटकांचा उत्साह
स्वागतार्ह; मात्र नियमांचा भंग करून स्वतःचा आणि
इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? असा
सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



No comments