मुरबाड शहरातील ताडआळी-देवीची आळी परिसरातील नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
गौरव शेलार / मुरबाड : शहरातील मुख्य बाजारपेठ
परिसरात असलेल्या ताडआळी आणि देवीची आळी भागातील नागरिकांना
गेल्या काही काळापासून वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने आज
संतप्त नागरिकांनी महावितरणच्या मुरबाड कार्यालयावर मोर्चा काढला.
वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून,
विशेषतः पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.
वीज नसल्यामुळे
पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा
लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित दखल घेतली जात
नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे अखेर संतप्त नागरिकांनी महावितरण
कार्यालयावर धडक देत आपला आक्रोश व्यक्त केला.
या मोर्चामध्ये
महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी महिलांनी महावितरण प्रशासनाच्या
कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी
केली. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अशी
संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, आमच्या
मागण्या लवकरात लवकर मान्य करून वीजपुरवठा सुरळीत न केल्यास मुरबाडमध्ये
जंतर-मंतरच्या धर्तीवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त महिला नागरिकांनी दिला आहे.
नागरिकांच्या या आक्रोशानंतर महावितरण प्रशासन या समस्येची
कितपत गांभीर्याने दखल घेते आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कोणती
कार्यवाही करते,
याकडे आता ताडआळी आणि देवीची आळी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले
आहे.



No comments