टीका एकीकडे... विकासाची वाटचाल दुसरीकडे; मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाची कामगिरीही तितकीच महत्त्वाची
कुणाल
शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागावर विविध विकासकामांच्या
संदर्भात वेळोवेळी आरोप, टीका आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले
जातात. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांनी प्रशासनाला प्रश्न विचारणे हा त्यांचा अधिकार
आहे. मात्र, प्रत्येक वेळी केवळ नकारात्मक बाजूच समोर येत
असताना विभागाकडून झालेल्या विकासकामांकडे दुर्लक्ष होणे हेही तितकेच दुर्दैवी
आहे.
मुरबाड सार्वजनिक
बांधकाम विभाग क्रमांक २ चे उपविभागीय अभियंता संजय कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि अधिपत्याखाली गेल्या काही वर्षांत तालुक्यातील अनेक गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये तसेच शहर परिसरात विविध विकासकामे राबविण्यात आली
आहेत. रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्ती, पूल, संरक्षक भिंती, शासकीय इमारतींची देखभाल, शैक्षणिक व सार्वजनिक इमारतींची कामे तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी
निगडित अनेक सुविधा उभारण्याचे काम विभागाने सातत्याने केले आहे.
विशेषतः
पावसाळ्याच्या काळात रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित ठेवणे, खड्डे बुजविणे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने
उपाययोजना करणे आणि नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी करून आवश्यक कामे हाती घेणे,
या जबाबदाऱ्या विभागाकडून सातत्याने पार पाडल्या जात आहेत. प्रतिकूल
हवामान, निधीची उपलब्धता, तांत्रिक
अडचणी किंवा प्रशासकीय प्रक्रिया यामुळे काही कामांना विलंब होऊ शकतो; मात्र त्यामुळे संपूर्ण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणे
योग्य ठरणार नाही.
उपविभागीय अभियंता
संजय कोरडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या समस्या
सोडविण्यासाठी आणि विकासकामांची गुणवत्ता राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील
असल्याचे अनेक कामांमधून दिसून येते. विकासकामांमध्ये पारदर्शकता, नियोजन आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याची
भावना अनेक नागरिक व्यक्त करतात.
विकासकामांबाबत
त्रुटी आढळल्यास त्यावर प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. परंतु त्याचवेळी चांगल्या
आणि दर्जेदार कामांचे कौतुक करणेही समाजाची जबाबदारी आहे. केवळ
आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून विभागाच्या कामगिरीचे
मूल्यमापन झाले, तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास
अधिक दृढ होईल.मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे योगदान
महत्त्वाचे असून, भविष्यातही अधिक दर्जेदार आणि लोकाभिमुख
विकासकामे करण्याचा विभागाचा प्रयत्न कायम राहील, अशी
अपेक्षा व्यक्त होत आहे.



No comments