web-banner-lshep2024

Breaking News

किन्हवली हत्याकांडाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; स्थानिक गुन्हे शाखा व किन्हवली पोलिसांची प्रभावी कामगिरी

 

गौरव शेलार / शहापूर  : शहापूर तालुक्यातील खरपत परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा करण्यात ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि किन्हवली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा तांत्रिक तपास, बारकाईने पुरावे संकलित करणे, संशयितांची सखोल चौकशी आणि समन्वयपूर्ण कारवाईच्या जोरावर आरोपीला जेरबंद करण्यात आले.

१६ जुलै २०२६ रोजी खरपत (ता. शहापूर) येथे वामन निऱगुडा यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना समोर आली होती. दुर्गम व जंगल परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र ठाणे ग्रामीण पोलिसांनी विविध तपास पथके तयार करून वैज्ञानिक व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान संशयित धनेश देव मेंगळ (वय ३५, रा. खरपत नं. १, ता. शहापूर) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत मयताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून आरोपीने कुऱ्हाडीच्या साहाय्याने वामन निऱगुडा यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला २९ जुलै २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या संपूर्ण तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (शहापूर) विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन खेन्सार यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा उलगडा केला.

या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खेन्सार,पोलीस उपनिरीक्षक महेश कदम , दिपेश किर्णी ,सहाय्यक फौजदार प्रकाश साळुंखे , पोलीस हवालदार संतोष सुर्वे ,हनुमान गायकवाड ,सुहास सोनवणे , योगेश शेळके , संदीप तांडेल , यशवंतराव ,जी. एम. पवार ,पोलीस नाईक सचिन चोगले ,पोलीस शिपाई जगदीश चॅटले,जयवंत बांगर,सचिन शेळके ,बालासाहेब बांबळे ,महिला पोलीस शिपाई स्मिता पेडे ,निलम सातपुते ,सपना पवार  तसेच अन्वेषण कक्षातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत, तांत्रिक माहिती, घटनास्थळावरील पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचत गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून नागरिकांकडून तपास पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments