web-banner-lshep2024

Breaking News

श्रमजीवी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; मुरबाडमध्ये १८० लाभार्थ्यांना जन्म दाखल्यांच्या आदेशांचे वितरण

 

कुणाल शेलार/मुरबाड: दुर्गम,आदिवासी आणि वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या श्रमजीवी संघटना, मुरबाड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.संघटनेच्या प्रयत्नांतून मुरबाड तहसील कार्यालयामार्फत तब्बल १८० लाभार्थ्यांना जन्म दाखल्यांच्या आदेशांचे वितरण करण्यात आले.हा वितरण सोहळा तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या हस्ते पार पडला.

जन्म दाखला नसल्यामुळे अनेक नागरिकांना शिक्षण,शासकीय योजना,विविध दाखले तसेच इतर आवश्यक कागदपत्रे मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.ही बाब लक्षात घेऊन श्रमजीवी संघटनेने संबंधित लाभार्थ्यांची कागदपत्रे संकलित करून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.त्यानंतर प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून १८० जणांच्या जन्म दाखल्यांच्या आदेशांना मंजुरी दिली.

 या कार्यक्रमाला श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष वैभव हिंदोळा, तालुका सचिव दिलीप शिद, तालुका उपाध्यक्ष बाळू मुकणे तसेच वरिष्ठ कार्यकर्ते जमन वाघ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तालुका सचिव दिलीप शिद म्हणाले,"दुर्गम भागातील गरीब,आदिवासी आणि गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काची शासकीय कागदपत्रे मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटना सातत्याने काम करत आहे.जन्म दाखला नसल्यामुळे अनेक मुलांचे शिक्षण,तसेच विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत होते.तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे आज १८० कुटुंबांना न्याय मिळाला असून,सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आमचा लढा यापुढेही कायम राहणार आहे."

याप्रसंगी तहसीलदार अभिजित देशमुख यांनी श्रमजीवी संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत,प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.दरम्यान,अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्म दाखल्यांच्या आदेशांची प्रत हाती मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून,श्रमजीवी संघटनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

No comments