छातीभर पाण्यात खांद्यावर मुलाला घेऊन मृत्यूला हरवणारे वर्दीतला माझा विठुराया पोलीस निरीक्षक पंकज गिरी
गौरव शेलार/पडघा : आषाढी एकादशीच्या उंबरठ्यावर "विठ्ठल...विठ्ठल..." या नामघोषात दंग असताना, दुसरीकडे मुसळधार पावसाने अनेक भागांना अक्षरशः वेढा घातला होता.नद्या दुथडी भरून वाहत होत्या.रस्ते पाण्याखाली गेले होते.घराघरांत भीतीचं सावट होतं.अशा वेळी अनेकांसाठी देवळातील विठ्ठल नव्हे,तर मदतीसाठी धावून आलेली खाकीच विठुराया ठरली.
भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात पूरस्थिती गंभीर झाली होती.अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते.घराघरात पाणी गेले चारही बाजुने पुराच्या पाण्यानी ओढलेले संकट आणि रस्त्याची वाट गायब झाली अशातच जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू होती.त्याच वेळी पडघा पोलीस ठाण्याचे डॅशिंग सिंघम म्हणून नेहमी चर्चेत आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी दाखवलेले धाडस आणि माणुसकी आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारी ठरली.
छातीभर वेगाने वाहणार्या पाण्यात,एका निष्पाप चिमुकल्याला त्यांनी आपल्या खांद्यावर उचलले.स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी त्या बालकांसह आपल्या मायमाऊली माता महिला भगिनींसह अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले.त्याक्षणी ते केवळ पोलीस अधिकारी नव्हते तर ते सर्वांच्या कुटुंबासाठी देवदूत होते.
आजही संत तुकारामांचा अभंग कानात घुमतो..."विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा..."
या अभंगातील विठुरायाचं रूप त्या दिवशी खाकी वर्दीत पंकज गिरी यांच्या रूपात प्रत्यक्ष दिसले.त्यांच्या खांद्यावर बसलेला तो चिमुकला म्हणजे जणू विठ्ठलाच्या कुशीत विसावलेलं लेकरूच! त्यांनी नागरिकांना संकट पुरपरिस्थितीतून नागरिकांना वाचवून सुरक्षिततेकडे घेतलेली पाण्याच्या प्रवाहातील वाटचाल जणू संकटातून जीवनाकडे निघालेली वारकरी दिंडी.
खाकी म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी नाही तर ती खरी जबाबदारी आहे.जबाबदारीतून विश्वास आणि विश्वासातून संकटाला मात देण्याची खरी शक्ती शपथ आहे.कोणत्याही आदेशाची वाट न पाहता जे अधिकारी नागरिकांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात,त्यांच्यामुळेच या खाकी वर्दीचा मान उंचावतो.आज समाजात अनेकदा पोलिसांवर टीका जरी केली जाते त्यामुळे पोलीस दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो परंतु पंकज गिरी यांच्यासारखे अधिकारी त्या सर्व प्रश्नांना आपल्या कृतीतून उत्तर देतात आणि अशा संकटात जणू त्यांनी स्वतःची पर्वा न करता तसेच कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा त्याचबरोबर कोणताही दिखावा न करता फक्त नागरिक सुरक्षित राहिले पाहिजेत या सद्भावनेने त्यांच्या कार्याची प्रशंसा करणे म्हणजे वावगं ठरणार नाही.
पूराच्या पाण्यात उभा असलेला तो अधिकारी केवळ एका मुलाला वाचवत नव्हता; तो समाजाचा पोलिसांवरील विश्वासही खांद्यावर घेऊन चालला होता.आज सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ते छायाचित्र अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे कारण त्या एका छायाचित्रात धाडस आहे,संवेदनशीलता आहे,कर्तव्यनिष्ठा आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नैतिकतेतून माणुसकी झरी जपणारे दृष्य डोळयासमोरच उभे आहे.
खरं तर प्रत्येक पोलीस अधिकार्याने आपल्या सेवेतून असा आदर्श निर्माण केला,तर खाकी वर्दीबद्दलचा सन्मान आणखी वाढेल.पंकज गिरी यांनी केलेली कृती ही केवळ बचावमोहीम नाही तर समाजासाठी दिलेला एक संदेश आहे"संकट कितीही मोठं असलं,तरी माणुसकीची झरी त्याहून मोठी असते."आजच्या काळात परमेश्वराला शोधण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही.संकटाच्या वेळी जी व्यक्ती दुसर्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो तिथेचखरे देवत्व अवतरते आणि म्हणूनच खांद्यावर चिमुकला,आपली आई असलेल्या मायमाऊलीचे हात धरून,हृदयात माणुसकी आणि अंगावर खाकी वर्दी त्यामुळे आज त्या वर्दीत साक्षात विठुरायाच दिसला असल्याचे नागरिकांच्या भावना विविध माध्यमातून व्यक्त होत आहे.
- '' YML NEWS '' चा सलाम -
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि त्यांच्या संपूर्ण बचाव पथकाला सर्व आमच्या व नागरिकांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि अशा आपल्या कर्तव्यनिष्ठ,संवेदनशील आणि धाडसी अधिकार्यांमुळेच समाजाचा कायदा व व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे.आपण जपलेली लोकसेवा हीच खरी शक्ती,हाच खरा धर्म,आणि हीच खरी माणुसकी असून आपल्या पुढील वाटचालीस आमच्याकडुन पुन्हा एका शुभेच्छा आहेत.



No comments