web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड तालुक्यात पूरस्थिती गंभीर; अनेक पूल पाण्याखाली, तहसीलदार अभिजित देशमुखांची प्रत्यक्ष पाहणी

 

कुणाल शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तात्पुरता तुटला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


तालुक्यातील करचोंडे,घोरले,चिखले आणि चासोळे या गावांजवळील पूल पाण्याखाली गेल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काळू नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नदीकाठावरील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या वाड्या-पाड्यांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला तसेच सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचीही प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. मुसळधार पावसामुळे काही नव्याने बांधलेल्या रस्त्यांवर तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीने दुरुस्ती व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिली.

 प्रशासनाने नागरिकांना पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

 

No comments