web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये ११ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

 

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील संभाजीनगर परिसरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणाचा मुरबाड पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत विविध तांत्रिक बाबींची पडताळणी करत आरोपींपर्यंत मजल मारली.

या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३४१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमान गोड यांनी आपल्या ११ वर्षीय मुलीचा घराबाहेर गेल्यानंतर बराच वेळ शोध घेतला. मात्र ती परत न आल्याने अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी सायली मिलिंद बाबरे (वय २७, रा. संभाजीनगर, मुरबाड) आणि दीपक भालचंद्र नागरे (वय ४६, रा. बदलापूर) यांना संशयाच्या आधारे ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीनंतर दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील तपास सुरू आहे.या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे करीत आहेत. अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पैलूंची बारकाईने चौकशी करण्यात येत असून, या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असल्याने अशा गुन्ह्यांतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि कायद्यातील कोणतीही पळवाट त्यांना मिळू नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांच्या हालचालींकडे सतर्कतेने लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

No comments