web-banner-lshep2024

Breaking News

राष्ट्रवादीत खळबळ! सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह?; अफवांना पूर्णविराम; उपाध्यक्ष डॉ.प्रमोद हिंदुरावांचे स्पष्ट उत्तर

 

गौरव शेलार /  मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. पक्षांतर्गत मतभेद, कथित नोटीस आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विविध पोस्ट व्हायरल होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रमोद हिंदुराव यांनी पुढे येत या सर्व चर्चांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपासून पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत विविध दावे केले जात असून, सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा रंगली आहे. काही पोस्टमध्ये पक्षांतर्गत नाराजीचा उल्लेख करण्यात आला असून, कथित नोटीसचाही दावा करण्यात येत आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या राजकीय भवितव्याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रमोद हिंदुराव यांनी अधिकृत भूमिका मांडत स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने, राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी आणि राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सहमतीने झालेली आहे. या निवडीवर कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक वक्तव्याचा किंवा सोशल मीडियावरील अफवांचा काडीमात्र परिणाम होत नाही.

डॉ. प्रमोद हिंदुराव म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून सातत्याने केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक दाव्याला सत्य मानण्याचे कारण नाही. पक्षाचे अधिकृत निर्णय हे पक्षाच्या संविधानानुसार आणि सक्षम नेतृत्वाच्या निर्णयातून घेतले जातात."

ते पुढे म्हणाले, "सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामुळे देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्या पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक पसरविल्या जाणाऱ्या अफवा, दिशाभूल करणारी वक्तव्ये किंवा सोशल मीडियावरील चर्चांकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजिबात लक्ष देऊ नये."

डॉ. हिंदुराव यांनी स्पष्ट केले की, पक्षाची अधिकृत भूमिका ही केवळ अधिकृत निर्णयांवर आधारित असते. सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अशा अफवांमुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रमोद हिंदुराव यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेचा पुनरुच्चार करत कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.

No comments