रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा; पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे - ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ
कुणाल शेलार / मुरबाड : भारतीय हवामान विभागाने (IMD) ठाणे महानगर क्षेत्रासाठी अतिमुसळधार पावसाचा (Red Alert) इशारा जारी केला असून जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.तसेच काही भागात ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मुसळधार पावसामुळे धबधबे, नद्या, तलाव, धरणे तसेच जलाशयांमधील पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता असून,अशा ठिकाणी पर्यटनासाठी किंवा फिरण्यासाठी जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील धबधबे,नद्या,धरणे,तलाव आणि इतर पर्यटनस्थळांवर जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.प्रतिबंधित ठिकाणी नागरिकांनी प्रवेश करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान,सर्व संबंधित विभागांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी,तसेच पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या विभागांनी पर्यटकांना प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.नागरिकांनी हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.



No comments