आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पदंश रुग्णांसाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालय सज्ज; जीव वाचविणारी ASV इंजेक्शने मोफत उपलब्ध....
कुणाल शेलार / मुरबाड : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे,ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
सर्पदंश
रुग्णांवर तातडीने आणि शास्रोक्त उपचार करण्यासाठी आवश्यक ASV
(Anti Snake Venom) इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध असून डॉक्टर,परिचारिका व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
भारतात
४०० हून अधिक सापांच्या प्रजाती असल्या तरी त्यापैकी केवळ चारच साप मनुष्यासाठी
अत्यंत विषारी मानले जातात. नाग व मण्यार यांचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करते, तर घोणस व रुसेल वायपर यांचे विष रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करते.या
दोन्ही प्रकारच्या विषासाठी आवश्यक असणारे ASV इंजेक्शन
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे.
सर्पदंश
झालेल्या रुग्णांवर उपचार करताना रक्त गोठण्याची क्षमता तपासण्यासाठी बीटी (Bleeding
Time) आणि सीटी (Clotting Time) या चाचण्या
करण्यात येतात.या चाचण्यांच्या आधारे उपचारांचा पुढील निर्णय घेतला जातो.उपचार
केवळ रक्त तपासणीवर अवलंबून असतात,असा अनेकांचा गैरसमज असून
नागरिकांनी तो दूर करावा,असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
डॉ.संग्राम
डांगे यांनी सांगितले की,विषारी साप चावलेल्या रुग्णाला
शक्य तितक्या लवकर,विशेषतः पहिल्या एका तासात रुग्णालयात
आणणे अत्यंत आवश्यक आहे.उशीर झाल्यास रुग्णाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ
शकतो.
रुग्णाची
स्थिती पाहून सुरुवातीला आवश्यकतेनुसार दहा ASV इंजेक्शने
दिली जातात. त्यानंतर दर चार तासांनी रुग्णाची तपासणी करून पुढील डोस दिला जातो.हे
उपचार शासनाच्या मानक उपचार पद्धतीनुसार (Standard Treatment Protocol) केले जातात.
खाजगी
रुग्णालयात हेच इंजेक्शन एका डोससाठी साधारण दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत मिळते.त्यामुळे
एका रुग्णाच्या उपचारासाठी अनेक हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो,मात्र मुरबाड ग्रामीण रुग्णालयात ही सर्व इंजेक्शने आणि उपचार पूर्णपणे
मोफत दिले जात असल्याने एका सर्पदंश रुग्णाचे सुमारे २५ हजार रुपयांपेक्षा अधिक
खर्चाची बचत होत आहे.
डॉ.डांगे
यांनी स्पष्ट केले की,अत्यंत गंभीर अवस्थेतील आणि
व्हेंटिलेटर किंवा अतिदक्षता विभागाची गरज असलेल्या रुग्णांनाच पुढील उपचारासाठी
संदर्भित (रेफर) केले जाते.इतर सर्व रुग्णांवर मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रभावी
उपचार केले जात आहेत.तसेच विंचूदंशासाठी लागणाऱ्या आवश्यक प्रतिविष औषधांचाही
पुरेसा साठा उपलब्ध आहे.
गरजू
आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारांअभावी जीव गमवावा लागू नये,या मानवतावादी भूमिकेतून वैद्यकीय अधीक्षक तथा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.
संग्राम डांगे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करताना सांगितले की,"सर्पदंश झालेला रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असेल आणि त्याची
आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे ASV (Anti Snake Venom) इंजेक्शन
खरेदी करणे शक्य नसेल, तर संबंधित रुग्ण अथवा त्यांच्या
नातेवाईकांनी कोणताही विलंब न करता थेट माझ्याशी संपर्क साधावा. मुरबाड ग्रामीण
रुग्णालयाकडून आवश्यक ASV इंजेक्शन पूर्णपणे मोफत उपलब्ध
करून दिले जाईल."त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "मात्र
संबंधित खाजगी रुग्णालयाने मुरबाड ग्रामीण रुग्णालयाकडून पुरविण्यात आलेल्या ASV
इंजेक्शनची नोंद रुग्णाच्या बिलामध्ये 'Free of Cost' अशी स्पष्टपणे करावी आणि त्या इंजेक्शनचा कोणताही खर्च रुग्णाकडून आकारू
नये. नागरिकांचा जीव वाचविणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे.आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही
सर्पदंश रुग्णाच्या उपचारात अडथळा येऊ देणार नाही असेही डॉ.संग्राम डांगे यांनी
सांगितले.
मुरबाड
ग्रामीण रुग्णालयात आता अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर,प्रशिक्षित
परिचारिका,अत्याधुनिक उपचार सुविधा,औषधांचा
मुबलक साठा,सिझेरियन तसेच सामान्य प्रसूतीची सुविधा आणि २४
तास आरोग्य सेवा उपलब्ध आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणताही विलंब न करता सर्पदंश
किंवा विंचूदंश झालेल्या रुग्णाला तातडीने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार
किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार
यांच्या सहकार्याने मुरबाड ग्रामीण रुग्णालयाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अधिक
सक्षम,विश्वासार्ह आणि तत्पर आरोग्यसेवा उभी केली असून,"रुग्णाचा जीव वाचविणे हेच आमचे सर्वोच्च कर्तव्य" या ध्येयाने
संपूर्ण आरोग्य यंत्रणा २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचा विश्वास
वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी व्यक्त केला.


.jpeg)

No comments