web-banner-lshep2024

Breaking News

जल जीवन मिशनमध्ये अनियमिततेचे आरोप; 'मयूर आका' नावाच्या सब-ठेकेदाराच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करा

 

गौरव शेलार/ मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आसोळे–असोसे परिसरातील ''मयूर'' नामक ''आका'' नी जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांबाबत ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून,संबंधित कामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय प्रभाविपणे आहे. या प्रकरणातील 'मयूर' नावाच्या सब-ठेकेदाराच्या कामांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 जल जीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले.मात्र आजही अनेक आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे.शासनाच्या नोंदीत योजना पूर्ण झाल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नळ बसले आहेत;मात्र नळांना पाणीच येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रश्नावर अनेक आंदोलने, उपोषणे आणि निवेदने देण्यात आली. मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देऊन आंदोलने मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित अधिकारी ठेकेदार आणि ''मयूर आका'' सब-ठेकेदारांची पाठराखण करत असल्याचा संशयही व्यक्त केला जात असून,या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी,अशी मागणी होत आहे.सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही या गंभीर प्रश्नाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने प्रभावीपणे लक्ष वेधले नसल्याची खंत व्यक्त होत आहे. विरोधक असोत किंवा सत्ताधारी,गावागावातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेतली जात नसल्याची टीकाही होत आहे.ग्रामस्थांनी संबंधित कामांची,बिलांची,मोजमापांची तसेच अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोटी बिले काढली गेली आहेत का,निकृष्ट कामे करून शासनाची दिशाभूल झाली आहे का,इस्टीमेन्ट पद्धतीने कामे झाली आहेत का याचाही तपास व्हावा,अशी मागणी पुढे येत आहे.

याशिवाय, संबंधित सोसायटी,मुख्य ठेकेदार आणि ''सब-ठेकेदार मयूर आका'' यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची मागणीही आता जोमाने होत आहे."जल जीवन मिशन आले...नळ आले...पण नळाला पाणीच नाही;मग विकास नेमका कुठे झाला?"असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल का, की पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर दाखवून विषय दडपला जाईल,याकडे संपूर्ण मुरबाड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments