web-banner-lshep2024

Breaking News

रुग्णसेवेला वाहिलेल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा गौरव; सहाय्यक अधीक्षक माणिक गोरक्षनाथ गायकवाड यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न...

 

कुणाल शेलार / मुरबाड : मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक श्री. माणिक गोरक्षनाथ गायकवाड हे नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.त्यांच्या प्रदीर्घ,प्रामाणिक व लोकाभिमुख सेवेला सलाम करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला सेवानिवृत्ती सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.श्री.गायकवाड यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात अधिकारी,कर्मचारी,सहकारी आणि सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करण्याचा आदर्श निर्माण केला.त्यांनी कधीही कोणामध्ये भेदभाव केला नाही.प्रत्येकाशी माणुसकीच्या नात्याने वागून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांनी विश्वासाचे स्थान निर्माण केले.

ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला व नागरिकाला त्यांनी संयमाने ऐकून घेत समाधानकारक मार्गदर्शन केले.त्यांच्या दालनात आलेली कोणतीही व्यक्ती निराश परत गेली नाही,अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.सेवाकाळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम,आरोग्य जनजागृती अभियान,विविध शासकीय कार्यक्रम आणि रुग्णहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडली.

आपल्या संपूर्ण सेवाकाळात त्यांनी प्रामाणिक, पारदर्शक आणि स्वच्छ प्रशासनाची जपणूक केली. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता त्यांनी आपले कर्तव्य बजावले. अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य जनतेशी त्यांनी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध हीच त्यांच्या सेवेची खरी ओळख ठरली. त्यांनी केलेली जनसेवा आणि रुग्णसेवा अविस्मरणीय असून त्याबद्दल उपस्थितांनी त्यांचा गौरव केला.

         

        या सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्यास मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे,टोकावडा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकीय अधीक्षक श्री.मोकाशी,रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर,क्लार्क अधिपरिचारिका, कार्यालयीन कर्मचारी,विविध विभागांचे अधिकारी,पत्रकार बांधव,हितचिंतक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी माणिक गायकवाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी निरोगी,आनंदी आणि यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी  माणिक गायकवाड यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात मोलाचे सहकार्य करणारे सर्व अधिकारी,डॉक्टर,अधिपरिचारिका,कर्मचारी,पत्रकार बांधव आणि सर्वसामान्य नागरिक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.अत्यंत भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने एका कर्तव्यदक्ष, सेवाभावी, लोकाभिमुख आणि प्रामाणिक अधिकाऱ्याच्या गौरवशाली सेवेला मानाचा मुजरा देत त्यांच्या नव्या जीवनप्रवासाला शुभेच्छांचा मंगल प्रारंभ करून दिला.

No comments