web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये केवळ 10 हॉटेल कर्मचाऱ्यांनी घेतले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र ; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता मुरबाडकडे लक्ष द्यावे...

 

कुणाल शेलार / मुरबाड : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळीविरुद्ध धडक कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. बनावट पनीर,दही,भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर मोठ्या प्रमाणात छापे टाकून कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.अन्नसुरक्षा व मानके कायदा,2006 अंतर्गत अस्तित्वात असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष भर दिला आहे.हॉटेल,रेस्टॉरंट व ढाबा चालकांसाठी ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे,वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे,स्वच्छतेचे नियम पाळणे,शाकाहारी व मांसाहारी अन्न पूर्णपणे वेगळे ठेवणे, स्वतंत्र भांडी व साठवण व्यवस्था ठेवणे,तसेच स्वयंपाकघर स्वच्छ आणि हवेशीर ठेवणे हे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            याशिवाय हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची नियमित वैद्यकीय तपासणी,वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र,स्वच्छ गणवेश आणि डोक्यावर कॅप वापरणेही बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम नवीन नसून अन्नसुरक्षा कायद्यात पूर्वीपासून अस्तित्वात होते.मात्र,अनेक ठिकाणी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर येत होती.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू करून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, छापे,जप्ती व आवश्यकतेनुसार आस्थापना सील करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

    दरम्यान,मुरबाड शहरातील परिस्थिती मात्र चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.शहरात मोठ्या संख्येने हॉटेल्स,रेस्टॉरंट्स आणि ढाबे कार्यरत असताना केवळ 10 कर्मचाऱ्यांनीच मुरबाड ग्रामीण रुग्णालयातून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घेतल्याची माहिती समोर आली आहे.यासंदर्भात मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व नेत्रशल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनीही आतापर्यंत केवळ दहा कर्मचाऱ्यांनीच वैद्यकीय तपासणी करून घेतल्याची माहिती दिली.यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुरबाडमधील हॉटेल्स,रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये काम करणाऱ्या उर्वरित कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केली आहे का? त्यांच्या आरोग्याची तपासणी नियमितपणे केली जाते का? स्वयंपाकघरात स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवले जाते का? तसेच अन्नसुरक्षा कायद्याचे सर्व नियम प्रत्यक्षात पाळले जात आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.

    या पार्श्वभूमीवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुरबाडमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची सखोल चौकशी करावी,नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी जोरदार मागणी होत आहे.

            जनहित लक्षात घेता,ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलणे गरजेचे असून,प्रत्येक हॉटेल,रेस्टॉरंट व ढाबा चालकाने अन्नसुरक्षा कायद्याचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये,यासाठी मुरबाडमध्येही एफडीएची धडक मोहीम राबविण्याची मागणी आता जोर धरत आहे.

---------------------------------------

शहरात मोठ्या संख्येने हॉटेल्स,रेस्टॉरंट्स आणि ढाबे कार्यरत असताना केवळ 10 कर्मचाऱ्यांनीच वैद्यकीय तपासणी करून मुरबाड ग्रामीण रुग्णालयातून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घेतले आहे.- डॉ.संग्राम डांगे (वैद्यकीय अधीक्षक व नेत्रशल्यचिकित्सक मुरबाड ग्रामीण रुग्णालय)

---------------------------------------

 

No comments