मुरबाडमध्ये बेकायदेशीर पॅथॉलॉजी व क्लिनिकल लॅबचे जाळे? कारवाई होत नसल्याने विधानभवनासमोर आमरण उपोषणाचा इशारा...
कुणाल शेलार / मुरबाड
:मुरबाड तालुक्यात बेकायदेशीररित्या सुरू
असलेल्या पॅथॉलॉजी लॅब व क्लिनिकल लॅबच्या चौकशीसाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी
करूनही ठोस कारवाई होत नसल्याने उपोषणकर्त्यांनी आता थेट मुंबईतील पावसाळी
अधिवेशनादरम्यान विधानभवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाची
माहिती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच संबंधित विभागांना लेखी स्वरूपात देण्यात आली
असूनही अद्याप कोणतीही निर्णायक कारवाई झालेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त
करण्यात आली आहे.
ठाणे
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांना
चौकशीचे आदेश दिल्यानंतर संबंधित पॅथॉलॉजी व क्लिनिकल लॅबना नोटिसा बजावण्यात
आल्या.आवश्यक कागदपत्रे आणि परवान्यांची माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
मात्र अनेक संबंधित लॅबचालकांनी अद्याप कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याचे समोर
आले आहे.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात गंभीर अनियमितता असल्याचा संशय अधिकच
बळावला आहे.
दरम्यान आरोग्य यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नोटिसा देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने संबंधित लॅबचालकांनी प्रशासनालाच
केराची टोपली दाखवल्याचे चित्र असल्याची टीका उपोषणकर्त्यांनी केली आहे.तक्रारीनुसार
काही ठिकाणी डीएमएलटी पात्रता असलेल्या युवक-युवतींना अत्यल्प मानधनावर काम करून
घेतले जात असल्याचा आरोप आहे. तसेच काही क्लिनिकल लॅब स्वतःला पॅथॉलॉजी लॅब म्हणून
दाखवत असल्याची बाबही निदर्शनास आली आहे. नगरपंचायतीकडून देण्यात आलेल्या ना हरकत
दाखल्यांच्या प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.



No comments