मुरबाड पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती अभियान...
गौरव शेलार / मुरबाड : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृती अभियान राबविण्यात आले. युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देत अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्याविरोधातील कायदेशीर तरतुदी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली.यशोदीप विद्यालय,सरळगाव आणि सिद्धी फार्मासिटिकल्स कॉलेज,नांदगाव येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.
याशिवाय मुरबाड बसस्थानक,मुख्य बाजारपेठ तसेच ग्रामीण भागात नागरिकांमध्येही जनजागृती करण्यात आली. अभियानाच्या समारोपावेळी उपस्थित युवक व विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची आणि समाजात जनजागृती करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
नागरिकांनी आपल्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री,वाहतूक किंवा सेवनासंबंधी कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ मुरबाड पोलीस ठाणे अथवा 'मानस' टोल-फ्री क्रमांक 1933 किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करावे,असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी यावेळी केले आहे.



No comments