माळशेज घाटात पुन्हा टेकड्या फोडण्याचा उद्योग? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गौरव शेलार / मुरबाड : वैशाखरे, उदाळडोह हायवे पासून माळशेज घाट ते मोरोशी सावर्णे मेर्दी येथील पुन्हा एकदा टेकड्या फोडून माती उत्खनन आणि वाहतुकीचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली असून यामुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. यापूर्वीही या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचे आरोप झाले होते. महसूल विभागाने काही ठिकाणी कारवाई करून दंडही आकारला होता, मात्र प्रत्यक्षात उत्खननाचे प्रकार थांबले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, घाट परिसरातील अनेक टेकड्या जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने खोदल्या जात असून मोठ्या प्रमाणावर मातीची वाहतूक केली जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या कामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारचे उत्खनन सुरू राहिल्यास दरड कोसळणे, भूस्खलन होणे आणि वाहतुकीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे, यापूर्वी कारवाई झाल्यानंतरही पुन्हा उत्खनन सुरू कसे झाले? संबंधित विभागांचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत का? की या प्रकारांना कोणाचे संरक्षण मिळत आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, घाट परिसरातील नैसर्गिक रचनेत मानवी हस्तक्षेप वाढल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
"महसूल मिळवण्यासाठी निसर्गाची लूट थांबवली नाही, तर भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,"अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
माळशेज घाट हा महाराष्ट्राच्या नैसर्गिक वैभवाचा महत्त्वाचा भाग असून त्याचे संवर्धन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सुरू असलेल्या उत्खननाच्या कामांची तात्काळ चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.



No comments