web-banner-lshep2024

Breaking News

शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार? गणेशनगरातील बांधकामावर कारवाईची मागणी

 

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड नगरपंचायत हद्दीतील गणेशनगर परिसरातून देवगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत सुरू असलेल्या एका सात मजली इमारतीच्या बांधकामामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी संरक्षणात्मक जाळ्या, सुरक्षित बॅरिकेड्स किंवा इतर आवश्यक सुरक्षाव्यवस्था पुरेशा प्रमाणात दिसून येत नाहीत. त्यामुळे बांधकाम साहित्य, वीट किंवा इतर वस्तू उंचावरून खाली पडल्यास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

विशेष म्हणजे, या मार्गाचा वापर दररोज मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक करत असतात. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.स्थानिकांनी याबाबत नगरपंचायतीकडे तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, काही नागरिकांकडून संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा सुरू असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बांधकामस्थळी सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपंचायत, बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

No comments