web-banner-lshep2024

Breaking News

भिवंडीत अन्न विषबाधेचा उद्रेक; फेमस शोरमामधील खाद्यपदार्थांमुळे 107 रुग्ण, दुकान बुलडोझरने पाडले !

 

भिवंडी, प्रतिनिधी  : भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरातील 'फेमस शोरमा' नावाच्या दुकानातून खरेदी केलेले चिकन शोरमा, पिझ्झा व फालुदा खाल्ल्यानंतर अन्न विषबाधेच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात बाधित रुग्णांची संख्या आता 107 पर्यंत पोहोचली आहे. सर्व रुग्णांवर इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खंडूपाडा येथील 'फेमस शोरमा' दुकानातील चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर विषबाधा पसरली.  

सुरुवातीला 14 जणांना विषबाधा झाल्याची नोंद होती. नंतर ही संख्या 88 वर गेली आणि आता ती 107 पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. बाधितांना मळमळ, उलट्या व पोटदुखीचा त्रास जाणवत होता.अन्न विषबाधेच्या गंभीर प्रकारानंतर प्रशासनाने कठोर कारवाई केली. संबंधित 'फेमस शोरमा'चे दुकान बुलडोझरने पाडण्यात आले. अन्न व औषध प्रशासन FDA देखील या प्रकरणी तपास व कारवाई करत आहे. दुकानातून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

बाधित रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयावर ताण आला आहे. रुग्णालय प्रशासनाने अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी व औषधसाठा तैनात केला आहे.आरोग्य विभागाने नागरिकांना बाहेरील खाद्यपदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अन्नपदार्थांची ताजेपणा, स्वच्छता व विक्री परवाना यांची खातरजमा केल्याशिवाय खरेदी करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

No comments